
आपण पीडितेसोबत राहण्याचा निर्णय घेतला, ही आपली चूक झाली का, असा सवाल चित्रा वाघ यांनी केला. तिला आवश्यक ती सर्व मदत केली. मात्र, आज त्या पीडितेने आपल्यावरच आरोप केले आहेत. ती कोणत्या मजबुरीमुळे हे आरोप करत आहे, याची आपल्याला माहिती नसल्याचेही त्या म्हणाल्या. पीडितेने केलेल्या आरोपांबाबत त्यांनी आपली बाजू मांडताना त्यांनी आपण कोणत्याही चौकशीसाठी तयार असल्याचे त्या म्हणाल्या. आपल्याकडे याबाबतचे पुरावे आहे. तिचे मेसेज आपल्याकडे आहेत आपला सीडीआर अहवालही पोलीस काढू शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी बोलवाल त्याठिकाणी चौकशीसाठी येण्यास तयार असल्याचे ते म्हणाले. ती पीडिता म्हणाली, त्यातील सर्व तथ्थ तपासा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा खोटा आरोप करायला चित्रा वाघ यांनी भाग पाडलं, अशी कबुली फिर्यादी महिलेने दिली आहे. काही दिवसांपूर्वी एका 24 वर्षांच्या महिलेने राज्य महिला आयोगाकडे रघुनाथ कुचिक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र, ती तक्रार देण्यासाठी वाघ यांनी भाग पाडल्याचं पीडितेचं म्हणणं आहे. मंगळवारी पीडिता पोलीस चौकशीसाठी जात असताना तिला पवार नामक व्यक्तिने एक पत्र आणून दिलं आणि रघुनाथ कुचिकांनीच ते पत्र दिल्याचा जबाब पोलिसांसमोर द्यावा, असं तिला सांगण्यात आलं. या पत्रात पीडितेवर तक्रार मागे घेण्यासाठीचा दबाव आणण्यासंदर्भातला मजकूर आहे. पण, असं कोणतंही पत्र व्यक्तिशः कुचिक यांनी पाठवलेलं नाही, अशी कबुली पीडितेने माध्यमांसमोर दिली आहे. मागील काही काळामध्ये वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यात आपले आणि कुचिक यांचे काही व्हॉट्सअॅप चॅट समोर आणले होते. पण, ते चॅट आमचे नव्हते. पण, ते माझ्या फोनमध्ये कसे आले, त्यासाठी त्यांची काही विशिष्ट यंत्रणा आहे का, याबाबत कल्पना नसल्याचं पीडितेचं म्हणणं आहे. मी गर्भवती होते तेव्हा कुचिक यांचा काहीही संबंध नसताना त्यांच्यावर आरोप करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. या सगळ्यात चित्रा वाघ, रोहित भिसे आणि महंमद अहमद या तिघांचा समावेश आहे. कुचिक यांच्याविरोधात आतापर्यंत जे घडलं त्यामागे या तिघांचा हात आहे, असा आरोप पीडितेने केला आहे. चित्रा वाघ यांनीच आपल्याला कुचिक यांच्याविरोधात तक्रार देण्यास भाग पाडलं. तक्रार न दिल्यास मला माझ्या कुटुंबासह मारण्याची धमकीही देण्यात आली, असा गंभीर आरोप पीडितेने केला आहे.


























































