
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण प्रकरणात आरोप करून आपण त्यांचे राजकीय जीवन उध्वस्त केले नाही काय, असा प्रश्न विचारताच भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ भडकल्या. प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारास पत्रपरिषदेत का बोलावले. यापुढे अशा ‘सुपारी’ पत्रकारांना आपल्या पत्रकार परिषदेत आमंत्रित करायचे नाही, असा दम स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांना दिला. यावेळी चित्रा वाघ आणि पत्रकारांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. या प्रकरणाची खमंग चर्चा आता यवतमाळात सुध्दा सुरु झाली आहे.
भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारतात चित्रा वाघ यांनी विदर्भ दौरा सुरू केला आहे. आज त्यांनी यवतमाळ येथे भेट दिली. यावेळी स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारने गेल्या 100 दिवसांत महिलांच्या सन्मानासाठी राबविलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. याच अनुषंगाने पत्रकारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री असलेले संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण प्रकरणात केलेले आरोप मागे घेऊन आपणही त्यांना क्लीनचिट दिली का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. तेव्हा आपली संजय राठोड यांच्याविरोधात सुरू असलेली लढाई त्यांच्यावर गुन्हे दाखल होईपर्यंत सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी राठोड यांना मंत्रीमंडळात घेतले. त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर आरोप करून त्यांचे राजकीय जीवन उद्धवस्त केले नाही काय, असा प्रश्न एका इंग्रजी दैनिकाच्या पत्रकाराने विचारताच वाघ यांनी, तुम्ही संजय राठोड यांचे पीआरओ असल्यासारखे बोलू नका. अशा पत्रकारांना आपल्या पत्रकार परीषदेत पुन्हा बोलवू नका असेही सांगीतले.
वाद वाढल्याने बहुतांश पत्रकारांना वाघ यांनी प्रश्न विचारू दिले नाही. त्यामुळे पत्रकार आणि वाघ यांच्यात वादाची ठिणगी उडाली. संजय राठोड यांच्या विरोधात लढाई सुरू केल्यानंतर गेल्या दोन वर्षात आपण व परिवाराने खूप त्रास सहन केला, असे वाघ म्हणाल्या. मात्र न्याय मिळेपर्यंत ही लढाई सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या वादानंतर सर्व पत्रकार निषेध नोंदवून पत्रपरिषदेतून बाहेर पडले. एकंदरीत या वादामुळे पुजा चव्हाण प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.























































