IPL 2022 गेलसह ‘या’ बड्या खेळाडूंनी घेतली लिलावातून माघार, जाणून घ्या कारण…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडियन प्रीमिअर लीग (IPL 2022) च्या 15 व्या मोसमासाठी पुढील महिन्यामध्ये खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या लिलावामध्ये जगभरातील क्रिकेटपटूंनी भाग घेतला असून या खेळाडूंची यादीही प्रसिद्ध झाली आहे. यात 896 हिंदुस्थानी, तरक 318 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. यंदा 10 टीम लिलावामध्ये असणार आहेत. परंतु अनेक बड्या खेळाडूंनी लिलावातून माघार घेतल्याने क्रीडाप्रेमींचा हिरमोड झाला आहे.

लिलावासाठी 18 देशाच्या 318 विदेशी खेळाडू खेळाडूंनी रजिस्ट्रेशन केले आहे. यात सर्वाधिक 59 खेळाडू ऑस्ट्रेलियाचे आहेत, तर दक्षिण आफ्रिकेचे 48, वेस्ट इंडिजचे 41, श्रीलंकेचे 36, इंग्लंडचे 30, न्यूझीलंडचे 29, अफगाणिस्तानचे 20, नेपाळचे 15 आणि यूएसएच्या 15 खेळाडूंचा समावेश आहे. यासह बांगलादेश, नामिबिया, ओमान, आयर्लंड, झिम्बाब्वे, भूतान, नेदरलँड, स्कॉटलंड आणि यूएईच्याही काही खेळाडूंनी रजिस्ट्रेशन केले आहे. मात्र आपल्या खेळाने गेम चेंज करणारे काही स्टार खेळाडू यात नाहीत.

ख्रिस गेल 

‘मिस्टर युनिव्हर्स’ ख्रिस गेल याच्या नावावर आयपीएलमधील सर्वोत मोठ्या खेळीची नोंद आहे. चौकार-षटकारांची आतषबाजी करून चाहत्यांचे मनोरंजन करणारा गेल यंदा आयपीएलच्या लिलावात दिसणार नाही, त्यामुळे तो यंदा या स्पर्धेला मुकणार आहे.

मिशेल स्टार्क

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क यानेही आपल्या नावाचे रजिस्ट्रेशन केलेले नाही. वेगवान चेंडू आणि यष्ट्यांचा वेध घेणारे यॉर्कर ही खासियत असणाऱ्या स्टार्कने आयपीएलमध्ये 27 लढतीत 34 विकेट्स घेतलेल्या आहेत.

बेन स्टोक्स

गेल्या वर्षी इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार घेतली होती. परंतु या वर्षी त्याने रजिस्ट्रेशन केले नसल्याने तो देखील या स्पर्धेला मुकणार आहे.

रुट, आर्चर

इंग्लंडचा स्टार बॅटर आणि घातक गोलंदाज जोफ्रा आर्चर यंदा 15 व्या हंगामात दिसणार नाही. त्यांनी आपले नाव लिलावासाठी दिलेले नाही.

दरम्यान, ख्रिस गेल याचे वय झाले असून यामुळेच त्याने माघार घेतल्याचे बोलले जात आहे. तर स्टार्क, रुट, स्टोक्स आणि आर्चर यांनी आगामी काळात खेळल्या जाणाऱ्या टी-20 आणि वन डे विश्वचषकाच्या तयारीला अधिक वेळ मिळावा आणि शरीर फिट रहावे म्हणून माघार घेतल्याची चर्चा आहे.