हायवेवर टॅक्सी चालकाला फिल्मी स्टाईलने लुटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिकचे पाच तरुण लुटमार करण्याच्या तयारीनेच मुंबईत आले. त्यांनी संगनमत करून टॅक्सी चालकाला लुटायचे ठरवले. त्यानुसार त्यांनी गुरुवारी मध्यरात्री एव्हरार्ड नगर येथे एका टॅक्सी चालकाला फिल्मी स्टाईलने लुटून पळ काढला. पण चुनाभट्टी पोलिसांनी तत्परता दाखवत चौघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून गुह्यात वापरलेला सुरा, मिरची पूडचा स्प्रे, लोखंडी फायटर जप्त करण्यात आले.

2 सप्टेंबरच्या पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास पाच इसम भायखळा येथे ललित तिवारीच्या टॅक्सीत बसले. त्यांनी मुलुंडला जायचे असल्याचे सांगितले होते. मात्र टॅक्सी शीव-पनवेल हायवेवरील एव्हरार्ड नगर येथे येताच टॅक्सीतील एकाने लघुशंका आल्याचे निमित्त करत टॅक्सी रस्त्याच्या कडेला उभी करण्यास सांगितले. त्यामुळे तिवारी याने टॅक्सी थांबवताच एकाने तिवारीच्या गळ्यावर सुरा लावला. त्याला तिवारीने प्रतिकार केला असता दुसऱयाने त्याच्याजवळील मिरचीचा स्प्रे तिवारीच्या चेहऱयावर मारला. मग सर्वांनी मिळून त्याला लाथा बुक्क्यांनी मारायला सुरुवात केली. त्यातच संधी साधत आरोपीने तिवारीच्या खिशातील रोकड व मोबाईल हिसकावून पळ काढला. तेवढय़ात चुनाभट्टी पोलीस ठाण्याचे बिट मार्शल शिवाजी सानप व तुकाराम पाटील हे गस्त घालत तेथे पोहचले. तेव्हा तिवारी तेथे डोळे चोळत बसला होता. पोलिसांनी विचारले असता तिवारीने घडला प्रकार सांगितला. सानप व पाटील यांनी लागलीच रात्रपाळी निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांना घडला प्रकार सांगितला. गायकवाड यांनी लगेच फौजफाटा घेऊन घटनास्थळी धाव घेऊन एका चोराला तेथेच पकडला. पण उर्वरित चौघे अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी ठरले. पकडलेल्या आरोपीकडे चोरलेला ऐवज व गुह्यात वापरलेले हत्यार सापडले.

नाशिकला पळाले, पण…

वरिष्ठ निरीक्षक दीपक पगारे व निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय जितेंद्र झोनम, विक्रम कोल्हे व पथकाने नाशकात जाऊन तिघा आरोपींना पकडून आणले. गौरव धनवटे (20), कृष्णा मघाडे (19), मयूर निकम (20) आणि मेहुल जाधव (18) या चौघा आरोपींना बेडय़ा ठोकल्या. या आरोपींनी याआधी कुठे गुन्हा केला आहे का याचा चुनाभट्टी पोलीस तपास करीत आहेत.