सिनेमा : जवानी ओ दिवानी तू जिंदाबाद

>>प्रा. अनिल कवठेकर

सौंदर्याचे वर्णन करणारी, प्रेमाची कबुली देणारी गाणी आपल्याला जवळची वाटतात. ही गाणी अनेक वेळा ऐकूनही मन भरत नाही. ती गाणी नीट ऐकली तर लक्षात येते की, बऱयाच गाण्यांमध्ये तेच तेच शब्द आहेत. त्या शब्दांचा क्रमसुद्धा सारखाच आहे, पण गाण्याची चाल मात्र वेगवेगळी आहे. ती चाल आपल्याला मंत्रमुग्ध करून टाकते आणि आपण पुन्हा जुन्या शब्दांतून आलेल्या नव्या गाण्याच्या प्रेमात पडतो. शब्दांचे सौंदर्य असणारे, अर्थांचे सौंदर्य उलगडणारे, वेगळेपणा मांडणारी अनेक गाण्यांपैकी एक ‘आन मिलो सजना’ यातले ‘जवानी ओ दिवानी तू जिंदाबाद…’
चित्रपटातली गाणी म्हणजे नायकाचे नायिकेवर असलेले प्रेम सांगणारी गाणी. नायकाचे तिच्यावर का प्रेम आहे? कारण त्याला तिचा स्वभाव आवडतो. तिचे रूप आवडते. प्रेमात पडल्यावर तिच्या सगळय़ा अदा त्याला आवडतात. त्यात त्याला सौंदर्य दिसते. असे म्हणतात की, लैला ही फार सुंदर नव्हती, पण लैलाचे सौंदर्य अनुभवण्यासाठी मजनूची नजर हवी. प्रत्यक्षात सगळेच त्यांच्या आयुष्यातल्या लैलाचे मजनू असतात. अशी प्रेमगाणी ऐकताना प्रत्येक अंतर्मन जणू आपल्याच प्रेयसीसाठी म्हणतोय असा अनुभव वारंवार घेत असतो. शब्दांचे सौंदर्य असणारे, अर्थांचे सौंदर्य उलगडणारे, वेगळेपणा मांडणारी अनेक गाणी आपल्याला ते पटतात, आवडतात आणि त्या शब्दांशी नकळतपणे जोडले जातो.

गाण्यांचा हा प्रवास अनेक दिवस चालत राहील इतकी प्रेयसीच्या सौंदर्याचे वर्णन करणारी गाणी हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये आहेत. त्याचबरोबर शब्दांचे सौंदर्य असणारी, अर्थांचे सौंदर्य उलगडणारी, वेगळेपणा मांडणारी आणि लोकप्रिय असणारी अनेक गाणी आहेत. जवानी म्हणजे काय, सांगणारी आनंद बक्षी यांच्या अनुभवी लेखणीतून उतरलेल्या आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी स्वरबद्ध केलेल्या किशोर कुमार यांचा स्वर्गीय आवाज लाभलेल्या ‘आन मिलो सजना’ यातील ‘जवानी ओ दिवानी तू जिंदाबाद…’ या गाण्यावर चर्चा करणार आहोत.

तारुण्य – हा काही तत्त्वज्ञानाचा विषय नाही, पण हे तत्त्वज्ञान गाण्यांमधून मांडणे, शब्दांमध्ये पकडणे, सूर, ताल, लय यांचा समन्वय साधणे, त्याच्या अर्थाचे सौंदर्य प्रकट करणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. आनंद बक्षी, लक्ष्मीकांत-प्यारेलाल आणि किशोर कुमार यांना ही कसरत अप्रतिमरीत्या साधता आली आहे. 1970 साली प्रदर्शित झालेले हे गाणे तेव्हापासूनच आपल्याला अनुभवाने समृद्ध करत आहे. पुढची दहा हजार वर्षे हे गाणे जुने होणार नाही. त्याचे संदर्भ जुने होणार नाहीत. इतके तारुण्याचे परिपूर्ण वर्णन करणारे गाणे आहे.

कश्मीरचा स्वर्गमय परिसर, टांग्यातून चाललेल्या कश्मिरी तरुणी आणि आपल्या विशिष्ट अदामध्ये त्यांना टाटा करणारा राजेश खन्ना गाणे सुरू होण्यापूर्वी पडद्यावर दिसतात. या मनमोहक वातावरणात कल्याणजी-आनंदजी यांचे अप्रतिम संगीत सुरू होते. सनई वाजवणारा 12-13 वर्षांचा जूनियर मेहमूद जो राजेश खन्नासारख्या सुपरस्टारसमोर कुठेही कमी न पडता आपल्या शरीराला, मानेला, पायाला असे काही झटके देतो आणि सनई वाजवतो की, त्या सनईचे स्वर ऐकताच टांग्यातून चाललेल्या कश्मिरी तरुणी टांगा थांबवतात आणि गाणे सुरू होते.

‘यहां वहां सारे जहां मे तेरा राज है
तेरे ही तो सर पे मोहब्बत का ताज है
जवानी ओ दिवानी तू जिंदाबाद…’

या विश्वात इथे, तिथे सर्वत्र ज्याचा जोर आहे, ज्याच्यामुळेच या विश्वाची ओळख बनली आहे, ज्यांना मान आहे, त्यांच्यात कर्तुत्व आहे, त्यांच्यात सृजनशीलता आहे, ज्यांच्यामध्ये नवीन दृष्टी आहे, ज्यांना या विश्वासाठी, लोकांसाठी, आपल्यासाठी काहीतरी निर्माण करायचे आहे. शिवाय ज्यांना खऱया अर्थाने प्रेम करण्याचा हक्क आहे असे हे वय म्हणजे, तारुण्य असे कवी सांगतो. कारण या वयातल्या प्रेमाला खुळेपणा म्हणा किंवा काही म्हणा, पण या वयातल्या प्रेमाला समाजात गृहीत धरले जाते. अशा तारुण्याचा, त्या वयातल्या वेडेपणाचा विजय असो असे कवीला म्हणायचे आहे. या पहिल्याच कडव्यात तारुण्य म्हणजे काय हे सांगताना गीतकार तारुण्य कसे हवे याचेही अप्रत्यक्षपणे मार्गदर्शन करतो. आज जे पन्नाशीत किंवा साठीत आहेत आणि त्यांना जर अपयशी वाटत असेल तर त्यांनी त्यांच्या तारुण्यात नेमक्या कोणत्या चुका केल्या होत्या त्या जरी आठवल्या तरी या गाण्याचा अर्थ अधिक भावेल. पुढच्या कडव्यात कवी म्हणतो,

तू बहारो का इशारा
बेसहारो का सहारा
सर पे तेरे हां, हां तेरे
बोझ है सारा
तेरे जवां हातो मे दुनिया की लाज है…

या जगात नव्या बहराचा इशारा ज्याला पहिल्यांदा कळतो व त्या इशाऱयाप्रमाणे जो स्वतःला बदलतो तोच यशस्वी होतो. या देशात जेव्हा पहिल्यांदा राजीव गांधी यांनी 1990-91 साली संगणक क्रांती घडवून आणली. तेव्हा अनेक ज्येष्ठांनी देशात संगणकामुळे बेकारी निर्माण होईल, रोजगार बुडतील, लोकांची कामे जातील असे सांगून संगणकाला विरोध केला होता. पण त्याच वेळी लाखो तरुणांनी मात्र हा क्रांतीचा, प्रगतीचा, पुढे जाण्याचा, यशस्वी होण्याचा मार्ग असल्याचे व त्यांच्या जीवनाला बहर देण्याचा मार्ग असल्याचे ओळखले. आज ती सर्व मंडळी प्रगतीच्या उंच शिखरावर पोहोचलेली आहेत. विमानाने प्रवास करत आहेत. ज्यांनी संगणकापासून स्वतःला दूर ठेवले ते अजूनही जुनी बैलगाडी सोडायला तयार नाहीत.

कवी म्हणतो, हा बहर समजून घेऊन तुला तुझी प्रगती करायची आहे. स्वतःची प्रगती झाल्यानंतर, तुला स्वतःसाठी जगायचे नाही, तर ज्यांना कोणीही नाही अशांनाही मदत करायची आहे. त्यांना मोठे करायचे आहे. या देशाचे नाव मोठे करण्याची, तुझ्या घराण्याचे नाव मोठे करण्याची, तुझ्या गावाचे नाव मोठे करण्याची तुझी जबाबदारी आहे. तुझ्या तरुण भुजांमध्ये समाजाला पुढे नेण्याचे बळ आहे. तरुणाईला त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देत कवी थांबत नाही, तर…

तेरे लिये कसमे नही
कसमे नही रस्मे नही
तू किसी के हां किसी के बस मे नही
जुदा सभी रस्मो मे तेरा हर रिवाज है…

या कडव्यातून गीतकार तरुणांची सामाजिक जाणिवेचे वर्णन करताना दिसतो. तारुण्य म्हणजे लाथ मारीन तिथे पाणी काढण्याची हिंमत ठेवणारी वृत्ती होय. जुने रीतीरिवाज, परंपरा जर जीवनामध्ये अडथळा वाटत असतील तर त्यांना न जुमानणारे तेजस्वी मन म्हणजे तारुण्य! तुझ्यासाठी कमजोर करणाऱया शपथेला फार महत्त्व नाही. परंपरेमध्ये जे चुकीचे आहे ते तुला मान्य होणार नाही. कारण तरुण आपल्या विचारांबाबत ठाम असतात. त्यांना पटणाऱया विचारांनी ते इतके प्रेरित असतात की, त्यापासून त्यांना कोणीही परावृत्त करू शकत नाही. जुनाट रीतीरिवाजांपेक्षा त्यांचे स्वतःचे नियम आहेत. त्या नियमानुसार जगण्याचा प्रयत्न करणारा म्हणजे तरुण होय.

पहिल्या पिढीला जे नवे सुचलेले असते ते दुसऱया पिढीपर्यंत येईपर्यंत जुने झालेले असते. ते जुने झाले तरी त्यातले जे योग्य आहे त्याचा मात्र तू स्वीकार करायला हवा. म्हणजे प्रगतीच्या दिशेने जाणाऱया जहाजाच्या वेगाला दिशा देण्यासाठी अनुभवाचा जाणतेपणा असलेल्यांच्या हातात त्या जहाजाचे सुकाणू असायला हवे असे गीतकार पुढच्या कडव्यात मांडतो.

पीछे है बचपन दिवाना
आगे बुढापा सयाना
साथ तेरे हां हां तेरे है ये जमाना
तेरी नजर तो चांद तारों पे आज है…

लहानपणातले वेडेपण तू आता मागे सोडले आहेस आणि तुझ्यापुढे ऊन-पावसाने तावून सुलाखून निघालेले म्हातारपण आहे. इथे म्हातारपण म्हणजे शहाणी व्यक्ती, जिने अनेक समस्येतून, अडचणीतून मार्ग काढत ज्ञान प्राप्त केलेली, असा माणूस आहे. इथे ‘शहाणा’ म्हणजे रामदास स्वामींनी सांगितलेला शहाणा या शब्दाचा अर्थ होय.

जे जे आपणासी ठावे
ते ते इतरांशी सांगावे
शहाणे करून सोडावे
सकल जन…

अशा शहाण्याचे तरुणाईने ऐकायला हवे असे गीतकार सांगतो.
प्रेमगीतांच्या आकाशामध्ये असे एखादे तारुण्याचे वर्णन करणारे इंद्रधनुष्य उगवावे आणि ते या गाण्यांच्या आकाशात उठून दिसावे. असे हे अप्रतिम तारुण्याची महती सांगणारे गाणे आहे. या गाण्यासाठी कवी आनंद बक्षी यांना मनापासून सलाम! सोप्या पद्धतीने त्यांनी तारुण्याची व्याख्या आपल्यासमोर या गीतातून मांडलेली आहे.
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)