हत्येच्या गुन्हय़ात परिस्थितीजन्य पुरावे पुरेसे नाहीत! पुण्यातील आरोपीला 2 वर्षांनी जामीन

पुण्यात दारूच्या पार्टी वेळी झालेल्या वादातून मित्राची हत्या करणाऱ्या आरोपीला दोन वर्षांनंतर उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. हत्येच्या गुह्यात परिस्थितीजन्य पुरावे पुरेसे नाहीत. घटनेपूर्वी आरोपी व मृत व्यक्ती हे दोघे एकत्र दिसले होते, याआधारे आरोपीला दीर्घकाळ तुरुंगात ठेवू शकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

पुणे जिह्यातील पुरंदर तालुक्यातील दिवे गावात 24 जानेवारी 2022 रोजी मध्यरात्री 56 वर्षीय अशोक भापकर यांची हत्या झाली होती. याप्रकरणी सासवड पोलिसांनी संजय भापकरला अटक केली होती. त्याच्या जामीन अर्जावर न्यायमूर्ती माधव जामदार यांच्यापुढे सुनावणी झाली. न्यायालयाने ऑमिकस क्युरी म्हणून अॅड. रेश्मा मुठा यांची नेमणूक केली होती. सरकारी पक्षाने सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केलेले नाही. कुठलाही थेट पुरावा वा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना तसेच खटल्यात प्रगती नसताना आरोपीला दीर्घकाळ तुरुंगात ठेवणे चुकीचे आहे, असा युक्तिवाद अॅड. मुठा यांनी केला. त्याची दखल घेत न्यायालयाने संजय भापकरला जामीन दिला.