चोपड्यात भाजपने घडवून आणलेल्या बदली विरोधात नागरिकांचे उपोषण सुरु

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुषार सुर्यवंशी । चोपडा

येथील कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या इर्षेपोटी भाजपने राजकीय दबाव आणत बदली घडवून आणल्यामुळे संतप्त नागरिकांनी पाटील यांची झालेली बदली रद्द व्हावी यासाठी उपोषण सुरु केले आहे. तर बदलीसाठी कारणीभूत ठरलेल्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.

पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना गुरूवारी भाजप शहराध्यक्ष नरेंद्र पाटील आणि माजी शहराध्यक्ष राजु शर्मा या पदाधिकार्‍यांनी मारहाण करून दुखापत केली होती. परिणामी भाजप पदाधिकार्‍यांना पोलिसांनी अटक केली होती. त्याचा बदला म्हणून राज्यातील सत्तेचा गैरवापर करत भाजपने पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांची बदली करवून आणलीच. जिल्हा पोलिस अधीक्षक देखील राजकीय इशाऱ्यांप्रमाणे काम करत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  एका कर्तव्यदक्ष अधिकार्‍याचा राजकारणाने बळी घेतल्याची भावना जनतेच्या मनात निर्माण झाली. यामुळे संतापलेल्या चोपडेकरांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ उपोषण सुरु केले आहे. ‘कर्तव्यदक्ष पोलीस अधिकार्‍यांवर अन्याय करु नका’, ‘पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांची बदली रद्द झालीच पाहिजे’ अशा घोषणा देण्यात येत आहेत. पो.नि.पाटील यांच्यावर अन्याय झाला आहे असे नागरिकांचे मत आहे.

शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख विकास पाटील, राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष राजू देशमुख, शिवसेना नगर सेवक महेंद्र धनगर, संतोष आहिरे यांच्यासह चोपडा शहर व तालुक्यातील नागरिकांचा उपोषणात सहभाग आहे.