नागरिकत्व विधेयकाला विरोध… आज राज्यसभेत काय होणार?

419

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरुद्ध ईशान्य हिंदुस्थानात भडका उडाला आहे. आसाम, त्रिपुरा, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मिझोराम या ईशान्येकडील राज्यांमध्ये मंगळवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. नागरिकांनी केंद्र सरकारविरुद्ध नारेबाजी करीत आंदोलने केली. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. रेल्वे आणि रस्ते वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या राज्यांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला असून, निमलष्करी दलासह पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, लोकसभेत नागरिकत्व विधेयक सोमवारी मध्यरात्री मंजूर झाले. आज हे विधेयक राज्यसभेत मांडले जाणार असून, सरकारसाठी ही कसोटीच असणार आहे.

पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील हिंदू, शीख, बौद्ध, पारसी, जैन आणि ख्रिश्चन निर्वासितांना हिंदुस्थानचे नागरिकत्व देण्यासाठी त्या कायद्यात दुरुस्ती करण्यास यापूर्वीही अनेकदा ईशान्य हिंदुस्थानातील नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात हे विधेयक लोकसभेत मंजूर झाले होते. मात्र, ईशान्यमधील राज्यांनी प्रचंड विरोध केला आणि हिंसाचाराचा आगडोंब उसळल्यामुळे विधेयक राज्यसभेत मांडलेच नव्हते. आता सोमवारी लोकसभेत मंजुरी मिळाल्यामुळे बुधवारी म्हणजे आज राज्यसभेत विधेयक मांडण्याची तयारी सरकारने केली आहे. ईशान्यकडील राज्यांमध्ये पुन्हा तणाव वाढला आहे.

…तर अमित शहांवर अमेरिकेने निर्बंध घालावेत

लोकसभेत मंजूर झालेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावरही उमटत आहेत. अमेरिकेच्या यूएस कमिशन फॉर इंटरनॅशनल रिलिजिअस फ्रीडम या अमेरिकन आयोगाने विधेयकावर चिंता व्यक्त केली आहे. हे आयोग आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यासाठी काम करते. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हे चुकीच्या दिशेने जाणारे धोकादायक वळण आहे. हिंदुस्थानच्या इतिहासाच्या आणि संविधानाच्या विरोधात जाणारे आहे. नागरिकत्वासाठी धार्मिक चाचणी घेणे चुकीचे आहे. जर हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाले तर हिंदुस्थानचे गृहमंत्री अमित शहांवर अमेरिकेने निर्बंध घालावेत, अशी मागणी आयोगाने केली आहे.

अरुणाचल प्रदेश, मेघालय,मणिपुरात बंदोबस्त वाढविला

मणिपूरमध्ये अनेक ठिकाणी मध्यरात्रीपासूनच आंदोलनांना सुरुवात झाली. नागरिकत्व विधेयक तत्काळ मागे घ्या; अन्यथा आणखी उग्र आंदोलन करण्याचा इशारा मणिपूर स्टुडंट युनियनने दिला आहे.

नागालँडमध्ये सध्या उत्सव सुरू आहे. नागालँड वगळता संपूर्ण ईशान्य भागात जोरदार आंदोलने सुरू असून, सीआरपीएफसह बंदोबस्तात मोठी वाढ केली आहे.

हिंदुस्थानचे उत्तर

हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकन आयोगाला जोरदार उत्तर  दिले आहे. हिंदुस्थानच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याचा अमेरिकन आयोगाला कोणताही अधिकार नाही. या आयोगाला महत्त्व देण्याचीही गरज नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी म्हटले आहे.

का आहे विरोध?

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकीमुळे ईशान्यकडील राज्यांचे विशेषाधिकार काढले जातील किंवा कमी होतील अशी नागरिकांना भीती आहे. संविधनाच्या सहाव्या शेडय़ूलमध्ये या ईशान्यमधील राज्यांना ‘इनर लाईन परमिट’सह विशेष अधिकार मिळाले आहेत. तसेच विधेयकामुळे सीमेवरील या राज्यांमधील लोकसंख्येमध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे लोकसंख्येचा समतोल बिघडण्याची भीती आहे.

आसाममध्ये जोरदार आंदोलन

सोमवारी मध्यरात्रीपासूनच गुवाहाटीसह अनेक ठिकाणी मशाल मोर्चे काढत नागरिकत्व विधेयकाला जोरदार विरोध सुरू केला. ऑल आसाम स्टुडंट युनियनने मंगळवारी बंदची हाक दिली होती. विविध विद्यार्थी संघटनांनी बंदला पाठिंबा दिला. गुवाहाटी, जोरहाट, दिब्रूगडसह अनेक ठिकाणी रस्त्यांवर टायर जाळली. बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता. शाळा-महाविद्यालये बंद होती. आंदोलनकर्त्यांनी विधानसभेवर धडक देण्याचा प्रयत्न केला. दिब्रूगडमध्ये सीआयएसएफ जवानांबरोबर धुमश्चक्री झाली. दरम्यान, राज्यांतील दळणवळण सेवा ठप्प झाली असून, रेल्वे आणि रस्ते वाहतूक बंद आहे.

  • राजधानी अगरताळासह त्रिपुरात अनेक ठिकाणी प्रचंड तणाव आहे. दहालाई जिह्यात नागरिकांनी मार्केटला आग लावली. यात अनेक दुकाने जळून खाक झाली.
  • अगरताळा, पश्चिम त्रिपुरा, खोवाई आदी जिह्यांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. बाजारपेठा, शाळा-महाविद्यालये बंद होती. रेल्वेसेवा बंद होती.
  • मेघालयाची राजधानी शिलाँगमध्ये वाहनांची तोडफोड करण्यात आली. रस्त्यांवर टायर जाळले. पोलीस गाडय़ांवर दगडफेक केली.
  • अरुणाचल प्रदेशमध्ये इटानगरसह अनेक ठिकाणी विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले. रस्त्यावर शुकशुकाट होता. सरकारी कार्यालयेही ओस पडली होती.

राज्यसभेत

  • एकूण सदस्य संख्या – 245
  • रिक्त जागा – 5
  • सध्याचे संख्याबळ – 240
  • बहुमतासाठी 121 सदस्यांचा पाठिंबा आवश्यक

पक्षीय बलाबळ – भाजप 83, काँग्रेस 46, तृणमूल काँग्रेस 13, अण्णाद्रमूक  11, सपा 9, बीजेडी  7, डावे पक्ष 5, टीआरएस 6, जेडीयू 6, द्रमूक 5, बसप 4, राष्ट्रवादी काँग्रेस 4, राजद 4, शिवसेना 3, अकाली दल 3, आप 3, तेलगुदेसम 2, वायएसआर काँग्रेस 2, अपक्ष व इतर 23.

आपली प्रतिक्रिया द्या