नागरिकत्व विधेयक संसदेत मंजूर, राज्यसभेत शिवसेनेचा सभात्याग

567

ईशान्य हिंदुस्थानात आगडोंब उसळला असतानाही नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले. साडेसहा तास झालेल्या वादळी चर्चेनंतर मतदान घेण्यात आले. विधेयकाच्या बाजूने 125 तर विरोधात 105 मते पडली. यावेळी शिवसेना काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. शिवसेनेने विधेयकातील काही तरतुदींना जोरदार आक्षेप नोंदवीत आपली खणखणीत भूमिका मांडली. मतदानावेळी शिवसेनेने सभात्याग केला. दरम्यान, यापूर्वीच सोमवारी हे विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दुपारी 12 वाजता नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मांडले. सुमारे साडेसहा तास विधेयकावर चर्चा झाली. विरोधकांनी या विधेयकाला जोरदार विरोध केला. हे विधेयक सिलेक्ट कमिटीकडे पाठविण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली. या मुद्दय़ावर मतदान घेण्यात आले. सिलेक्ट कमिटीकडे पाठविण्याचा प्रस्ताव 124 विरुद्ध 99 मतांनी फेटाळण्यात आला. रात्री आठच्या सुमारास 14 दुरुस्त्यांवर मतविभाजन होऊन नागरिकत्व विधेयक मंजूर झाले. विधेयकाच्या बाजूने 125 मते तर विरोधात 105 मते पडली. जेडीयू, अकाली दलासह अण्णा द्रमुक, बीजेडी, टीडीपी आणि वायएसआर काँग्रेसने विधेयकाला पाठिंबा दिला. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, बसपा, सपा, डाव्या पक्षांनी विधेयकाला विरोध केला.

पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातील हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी, ख्रिश्चन यांना नागरिकत्व देण्याचा विधेयकात उल्लेख आहे, मात्र श्रीलंकेतील तामीळ नागरिकांचा उल्लेख केलेला नाही, असा आक्षेप विरोधकांनी नोंदविला. यावर अमित शहा म्हणाले, यापूर्वी श्रीलंकेतील तामीळ नागरिकांना हिंदुस्थानचे नागरिकत्व दिले आहे. त्यांच्या या उत्तराने विरोधकांचे समाधान झाले नाही. यावेळी गृहमंत्री शहा यांनी काँग्रेसवर पुन्हा टीका केली. काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात पाकिस्तानातील हिंदू आणि शीख समाजातील 13 हजार लोकांना हिंदुस्थानचे नागरिकत्व दिले होते, असे ते म्हणाले. या विधेयकामुळे संविधानातील कमल 14चे उल्लंघन होत नसल्याचा दावा त्यांनी केला.

शिवसेनेचा सभात्याग
राज्यसभेत खणखणीत भूमिका मांडल्यानंतर शिवसेना संसदीय पक्षनेते, खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली खासदार अनिल देसाई आणि खासदार राजकुमार धूत यांनी या विधेयकावरील मतदानावेळी सभात्याग केला.

‘नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्याने मी आनंदी आहे. बंधुभाव आणि दयेच्या दृष्टिकोनातून हिंदुस्थानसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. विधेयकाच्या बाजूने ज्या सदस्यांनी मतदान केले त्या सर्वांचा मी आभारी आहे. – पंतप्रधान नरेंद्र मोदी

हिंदुस्थानच्या संविधानाच्या इतिहासातील आजचा काळा दिवस आहे. आपले पूर्वज ‘आयडिया ऑफ इंडिया’च्या ज्या आदर्शला घेऊन वाढले होते त्यांच्या विरोधात हे विधेयक आहे. धार्मिक भेदभाव करणारे हे विधेयक आहे. – सोनिया गांधी, (काँग्रेस अध्यक्षा)

मुस्लिमांना नागरिकत्व देण्याचा मार्ग बंद होणार नाही – गृहमंत्री शहा
चर्चेला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, या विधेयकात मुस्लिमांना नागरिकत्व देण्याचा उल्लेख नसला तरी मुस्लिमांच्या नागरिकत्वाचा मार्ग बंद होणार नाही. मुस्लिमांकडून नागरिकत्वासाठी अर्ज आल्यास त्याचा विचार केला जाईल. मोदी सरकारच्या काळात 566 मुस्लिमांना हिंदुस्थानचे नागरिकत्व देण्यात आले आहे. देशातील मुस्लिमांनी घाबरण्याचे कारण नाही. मुस्लिम देशाचेच नागरिक आहेत, असेही शहा यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या