
मुंबईतील एका शाळेच्या मुख्याध्यापकाला न्यूड व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी मिळाल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी मुख्याध्यापकाने अज्ञात सायबर चोरांविरुद्ध तक्रार केली आहे.
मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागात मुख्याध्यापकांनी याबाबत तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार, त्यांनी 1200 डॉलर्स बिटकॉईन स्वरूपात द्यावेत नाहीतर त्यांचा न्यूड व्हिडीओ व्हायरल करण्यात येईल, अशी धमकी मेलद्वारे देण्यात आली होती.
तक्रारदार हे मध्यमवयीन असून त्यांची सोशल मीडियावर एका महिलेशी ओळख झाली होती. काही काळ चॅटिंग केल्यानंतर त्या महिलेने त्यांच्याकडे त्यांचा खासगी क्रमांक मागितला. त्यावरूनही त्यांचं बोलणं सुरू झालं. एक दिवस या महिलेने तक्रारदारांना व्हिडीओ कॉल केला. तो कॉल उचलल्यानंतर ती महिला विवस्त्र असल्याचं त्यांनी पाहिलं. त्या महिलेने त्यांनाही तसंच करायला सांगितलं.
तक्रारदार मुख्याध्यापकाने तिने सांगितल्यानुसार कृती केली. तो व्हिडीओ कॉल संपल्यानंतर महिलेने स्वतःहून कोणताही संपर्क ठेवला नाही. आणि अचानक एक दिवस मुख्याध्यापकाला खंडणीसाठी इमेल येऊ लागले. त्यात 1200 डॉलर्स बिटकॉईन स्वरुपात देण्याची मागणी करण्यात आली होती. नाहीतर त्याचे व्हिडीओ कॉल व्हायरल करण्यात येतील अशी धमकीही होती. त्यामुळे मुख्याध्यापकाने पोलिसांशी संपर्क साधला.





























































