न्यायाधीशांनी अधिकारांचा वापर नम्रतेने करावा, सरन्यायाधीश भूषण गवईंनी टोचले कान

न्यायाधीशांनी अधिकारांचा वापर अत्यंत नम्रतेने व जबाबदारीने करायला हवा, अशा शब्दांत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी शनिवारी कान टोचले.

केंद्रीय प्रशासकीय न्यायाधीकरणाच्या (कॅट) दहाव्या अखिल भारतीय संमेलनात मार्गदर्शन करताना सरन्यायाधीश गवई यांनी न्यायाधीशांना एक प्रकारे समजच दिली. न्यायाधीश, न्यायिक अधिकारी व न्यायाधीकरणाचे सदस्य या नात्याने आपल्याकडे खूप विशेषाधिकार असतात. न्यायाच्या अपेक्षेने प्रत्येकजण न्यायपालिकेचे दार ठोठावत असतो. त्यामुळे न्यायालयाचे निकाल निष्पक्ष हवेत, असेही सरन्यायाधीश गवई यांनी नमूद केले.

न्यायाधीश, वकील सुवर्ण रथाची चाके

न्यायाधीश व वकील हे न्याय दानाच्या सुवर्ण रथाची दोन चाके आहेत. दोघेही समान आहेत. या दोघांनी एकत्रित काम करत नाही तोपर्यंत देशाच्या शेवटच्या नागरिकापर्यंत न्याय पोहोचू शकत नाही, असे सरन्यायाधीश गवई यांनी नमूद केले. न्यायाधीशाच्या कठोर वर्तनामुळे एक तरुण वकील बेशुद्ध पडल्याची घटना नुकतीच घडली आहे. याने असे स्पष्ट होते की काही न्यायाधीशांबाबत वकिलांमध्ये असंतोष आहे, असेही सरन्यायाधीश गवई यांनी सांगितले.

हजारो नागरिक प्रभावित होतात

न्यायाधीशांमुळे हजारो नागरिक प्रभावित होतात. याने न्यायपालिकेवरच्या विश्वासाला आकार मिळतो. न्यायाधीशांची जबाबदारी मर्यादित नाही, असे सरन्यायाधीश गवई यांनी स्पष्ट केले.

नवख्या न्यायाधीशांवर नाराजी

तीन वर्षे वकिली केल्यानंतरच प्रथमवर्ग महानगर दंडाधिकारी होण्याची परीक्षा देता येईल, अशी अट घालण्यात आली आहे. कारण काही नवखे दंडाधिकारी 40 ते 50 वर्षे वकिली केलेल्या ज्येष्ठ वकिलांना जुमानत नाहीत. त्यांना खुर्चीची नशा आलेली असते, असे परखड मत सरन्यायाधीश गवई यांनी व्यक्त केले.

न्यायावर प्रेम करणारा नेता हवा

मार्टिन लूथर किंग यांचे भाषण द बर्थ ऑफ ए न्यू जजची आठवण करून देत सरन्यायाधीश गवई म्हणाले, आपल्याला नेता असा हवा जो पैशावर नाही तर न्यायावर प्रेम करेल. जो प्रचार नाही तर मानवतेवर प्रेम करेल. स्वातंत्र्यासाठी आपल्या अहंकाराचा त्याग करेल, असा नेता आपल्याला हवा.