बिबटय़ाचा मानवी वस्तीमधील वावर थांबवण्यासाठी आरेमध्ये स्वच्छता मोहीम, शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनानिमित्त उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आरेच्या विविध भागांमध्ये कचऱयांचे प्रमाण वाढल्याने अनेक ठिकाणी मोकाट जनावरांचा संचारही वाढला आहे. त्यामुळे कचऱयांच्या ठिकाणी बिबटय़ाचा संचार वाढल्याचे निदर्शनास आले आहे. त्या पार्श्वभूमीवर कचऱयांची 56 ठिकाणे निश्चित केली असून ती कचरामुक्त करण्यासाठी  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी आमदार रवींद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 8 वाजल्यापासून स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. या स्वच्छता मोहिमेत आरेतील सर्व जनतेने, सेवाभावी संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन वायकर यांनी केले आहे. तसेच आरेचा परिसर कायमस्वरूपी स्वच्छ ठेवण्यासाठी त्यांनी 25 लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली.

या बैठकीला सहवनसंरक्षक अधिकारी गिरीजा देसाई, वनक्षेत्रपाल  आर.व्ही. भोर्टर, पालिका उपायुक्त संगीता हसनाळे नगरसेविका रेखा रामवंशी, भारत तोरणे, सुभाष दळवी, महिला विधानसभा संघटक शालिनी सावंत, शाखाप्रमुख विलास तावडे, उपविभागप्रमुख जितेंद्र वळवी, संदीप गाढवे उपस्थित होते.

बिबटय़ाच्या हल्ल्यातील जखमींना मदत

बिबटय़ाच्या हल्ल्यातील गंभीर जखमी झालेल्या आरेतील चार जणांना उपवनसंरक्षक, ठाणे वनविभागाकडून सव्वा लाख रुपये आर्थिक मदतीच्या धनादेशाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.