सांगली महापालिका क्षेत्रात स्वच्छता मोहिम गतीने राबवा, जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांचे निर्देश

नागरी भागात शिरलेले पुराचे पाणी ओसरू लागले आहे. त्यामुळे चिखल व इतर भिजलेल्या साहित्यामुळे रोगराई पसरू नये, यासाठी महापालिका क्षेत्रात स्वच्छता मोहीम गतीने राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी सांगली, मिरज व कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातील गणपती पेठ, कृष्णामाई घाट, भाजीमंडई, साठेनगर, सिद्धार्थनगर या भागांची पाहणी केली. यावेळी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त राहुल रोकडे, चीफ सॅनिटरी इन्स्पेक्टर अविनाश पाटणकर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, महापालिका हद्दीतील अजूनही 8 ते 10 क्षेत्रे पाण्याखाली आहेत. ज्या भागातील पाणी पूर्णपणे ओसरले आहे. त्या भागात स्वच्छता मोहीम तातडीने सुरू करण्यात यावी. प्राधान्याने स्वच्छता मोहीम राबविणे आवश्यक असलेल्या भागात आरोग्य पथकांना पाठविण्यात यावे. महापालिकेच्या वतीने पूरकाळात ड्रोनद्वारे करण्यात आलेल्या चित्रीकरणाच्या आधारे 2021ची पूररेषा निश्चित करावी. त्याचबरोबर त्याचे अभिलेख तयार करून बाधित ठिकाणांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत. लेप्टोस्पायरोसिसची साथ पसरू नये, यासाठी प्रतिबंधक गोळ्यांचे वाटप सुरू करावे. तसेच मशिनरीने औषधफवारणी सुरू करण्याचा आदेश त्यांनी दिला.

आयुक्त कापडणीस म्हणाले, महापालिका क्षेत्रात पाणी ओसरलेल्या भागात महापालिकेची 200 वाहने व मशिनरी, तसेच दोन हजार अधिकारी-कर्मचाऱयांच्या साहाय्याने स्वच्छता मोहीम सुरू आहे. मुंबई मनपाचे स्वच्छता पथकही कार्यरत झाले आहे. पिण्याच्या पाण्याच्या बहुतांशी योजना सुरू करण्यात आल्या असून, बंद पडलेल्या योजनांची तत्काळ दुरुस्ती करण्यात येणार आहे.

नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी 59 पथके

महापालिका क्षेत्रातील पूरबाधित घरांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठी 59 पथके कार्यरत करण्यात आली आहेत. सांगली, मिरजेतील पूरबाधित भागांतील नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी महापालिका, महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या टीमकडून प्रत्यक्ष पंचनामा करण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. घरपट्टी विभागाचे लोक यासाठी मदत करीत आहेत. 37 पथके घरगुती पंचनामे करीत असून, 22 पथके व्यापारी आस्थापनांच्या नुकसानीचे पंचनामे करणार आहेत. प्रत्येक पथकात तीन कर्मचारी आणि एक व्हिडीओग्राफर देण्यात आला आहे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या