श्री जोतिबा डोंगरावर स्वच्छता मोहीम; महाद्वाराला सुंदरतेची झळाळी

साहस हा पाया आणि ऐतिहासिक वास्तूचे जतन हेच ध्येय बाळगलेल्या विविध गिर्यारोहक व संघटनांकडून दख्खनचा राजा श्रीजोतिबा डोंगरावरील सेंटर प्लाझा येथे स्वच्छता मोहीमेतून महादरवाजास नवी झळाळी लाभली आहे. त्यामुळे त्यांच्या सौंदर्यात वाढ होत त्याची भव्यता मनात भरत आहे.

कोरोना महामारीमुळे घेण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि निर्बंधामुळे जोतिबा डोंगरावरील ऐतिहासिक वास्तू,मंदिरे बंद आहेत. त्यामुळे इच्छा असूनही भक्त दर्शनाला येऊ शकत नाहीत. मार्चपासून घेण्यात आलेला लॉकडाऊन आणि पावसामुळे मंदिर आणि ऐतिहासिक वास्तुवर झाडे-झुडपे वाढले आहे. त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूचे सौंदर्य कमी होत आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये ज्योतिबा डोंगर सेंटर प्लाझा येथील महाद्वार गिर्यारोहण तंत्राचा वापर करून स्वच्छ करण्यात आले. गिर्यारोहक सुरज ढोली व भिकाजी शिंगे यांनी पाच तास परिश्रम करत महाद्वाराची तटबंदी, भिंतीवरील झाडेझुडपे, खुरटे,तणकट काढले. त्यानंतर परिसराची स्वच्छता करण्यात आली. ग्रामस्थांनी या स्वच्छता मोहिमेचे कौतुक केले आहे.

या परिसरात एक ट्रॉली एवढ्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा होता. स्वच्छता करून परिसरात औषध फवारणी करण्यात आली. पुढील टप्यात जोतिबा मंदिरासमोरील नगारखाना, दक्षिण दरवाजा यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. तसेच इतर पुरातन वास्तूंचीही टप्प्याटप्प्याने स्वच्छता करणार असल्याचे सुरज ढोली यांनी सांगितले. विनोद ढोली, कृष्णात बूने, रोहित ढोली, दीपक ढोली, दिग्विजय उपारी, अमर सातार्डेकर , कृष्णात ढोली, सुरज बुने, शिवतेज ढोली, सायबु नवाळे, प्रविण डबाणे, विनायक बुने, अमर शिंगे, पंढरीनाथ जाधव, भोला यादव, बालमावळा सूर्यभान ढोली आदी स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंच, हिला रायडर्स ॲडव्हेंचर फाऊंडेशन,धर्मवीर तरुण मंडळ ज्योतिबा डोंगर यांनी ही स्वच्छता मोहिम आयोजित केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या