
सामना प्रतिनिधी । नांदेड
एक वकिल आणि त्याच्या मुलाने मिळून सन 2013 पासून आजपर्यंत 16 लाख 46 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दिल्यानंतर इतवारा पोलिसांनी या प्रकरणी दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
शेख रसुल शेख नन्हेसाब रा. गुलजारबाग नांदेड यांना नुकसान भरपाई आणि मावेजा मिळवून देतो असे सांगून तसेच न्यायालयाच्या खोट्या पावत्या बनवून त्यांची फसवणूक मदिना नगर, देगलूर नाका येथे राहणारे अॅड. शोयब आणि अॅड. जहिरोद्दीन या दोघांनी केली आहे. शेख रसुल शेख नन्हे यांचे शेतीचे दिवाणी प्रकरण क्रमांक 66/2013 हे अर्धापूर न्यायालयात आणि आर.ओ.आर. क्रमांक 59/2015 सुरू होते. हे प्रकरण मी चालवतो म्हणून अॅड. शोयब व अॅड. जहीरोद्दीन यांनी शेख रसुलची भेट घेतली आणि त्यांच्याकडून वेगवेगळ्या वेळेस मिळून 16 लाख 46 हजार 500 रुपये घेतले. हे पैसे दिल्याबाबतच्या वेगवेगळ्या तारखा शेख रसुल यांनी आपल्या तक्रारीत नमुद केल्या आहेत. त्यात संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालय आणि उच्च न्यायालय यांच्या समक्ष सुरु असलेल्या प्रकरणांची माहिती सुध्दा दिलेली आहे.
आपली फसवणूक झाली हे समजताच शेख रसूल यांनी अॅड. शोयबकडे आपले पैसे परत मागितले असता शेख रसुल शेख नन्हे हे अतिरेकी संघटनांशी संबंधीत असल्याचा निनावी अर्ज अॅड. शोयबने एटीसीला दिला. त्यावरुन ए.टी.सी.ने नन्हे यांची भरपूर चौकशी केली आणि शेख रसुलचा अतिरेकी संघटनांशी कांही एक संबंध नसल्याचे दिसल्यानंतर ए.टी.सी.च्या अधिकाऱ्यांनी अॅड. शोयब विरुध्दच खोटी तक्रार देवून नन्हे यांना नाहक त्रास दिल्याचा गुन्हा दाखल केला होता.































































