हवामानाचा बदललेला आलेख

103

>> किरणकुमार जोहरे

आयएमडीने 145 वर्षे पूर्ण केल्यानंतरच्या कार्यक्रमात पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन यांनी नुकतीच एक महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे. हवामानाच्या नोंदी लक्षात घेता हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा या ऋतूंचे महिने अधिकृतपणे बदलले जाण्याची चिन्हे आहेत. 1941 साली मान्सून परतण्याची तारीख 30 सप्टेंबर अशी ठरवली गेली होती. मात्र आता 30 सप्टेंबरनंतर मान्सून परतताना 10 ते 15 दिवस उशीर होणार आहे. केरळपासून 1 जूनलाच मान्सून आपला प्रवास सुरू करणार आहे. आयएमडीचा कारभार पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत चालतो. लोकांना माहिती देण्यासाठी आम्ही 1940 चे हवामानशास्त्र वापरू शकत नाही, हे थोडेसे विचित्र आहे अशी प्रांजळ कबुलीदेखील त्यांनी दिली.

30 सप्टेंबरला भारतीय हवामानशास्त्र विभागचा (आयएमडी) मान्सून 1 जूनला सूरू होऊन 30 सप्टेंबरला संपतो. आता मान्सूनचा पॅटर्न बदलेला असल्याने 15 नोव्हेंबरपर्यंत होणारा पाऊसदेखील मान्सूनमध्ये मोजला जावा आणि त्यासाठी मान्सूनची व्याख्या तातडीने बदलण्याची गरज आहे. 1940 पासून मान्सूनची जुनी व्याख्या मोडीत काढून ‘1 जून ते 15 नोव्हेंबर’ या कालावधीत होणारा पाऊस म्हणजे मान्सून!’ अशी नवी व्याख्या हवामान खात्याने आता स्वीकारायला हवी, अशी मागणी लेखकाने केली होती. ‘आयएमडी’ची फोरकास्टिंग मॅन्युअल्स 1971 सालची जुनी व टाकाऊ आहेत, असे ही त्यांनी निदर्शनास आणून दिले होते. गेल्या 18 वर्षांपासून मान्सूनच्या बदलत्या पॅटर्नची दखल घ्यावी यासाठी त्याचा पाठपुरावा व जनजागृती सुरू आहे.
गेल्या काही वर्षांतील हवामानाच्या नोंदी लक्षात घेता हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा या ऋतूंचे महिने अधिकृतपणे बदलले जाण्याची चिन्हे आहेत. तसे संकेत भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्र यांनीदेखील दिले आहेत.

जून ते सप्टेंबर पावसाळा, ऑक्टोबर ते जानेवारी हिवाळा आणि फेब्रुवारी ते मे उन्हाळा असे ऋतूंचे वेळापत्रक हिंदुस्थानात आहे. मात्र गेल्या काही वर्षांत हे सारेच ऋतू मागेपुढे होत आहेत. त्यामुळे फेब्रुवारीत थंडी व ऑक्टोबरमध्ये पाऊस पडत आहे. हिंदुस्थानी हवामानावर प्रामुख्याने परिणाम करणारा घटक म्हणजे मान्सून. मेच्या अखेरीस तो अंदमानात तर 1 जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होतो. मात्र गेल्या काही वर्षांत मान्सून हिंदुस्थानच्या महासागरात दाखल झाला तरी मध्य हिंदुस्थानात येण्यास उशीर होत आहे. जूनअखेरीस वा जुलैच्या पहिल्या आठवडय़ात तो मध्य हिंदुस्थानात सक्रिय होत आहे. त्याचा परतीचा प्रवासही लांबत आहे. ही बाब हवामान विभागाने गांभीर्याने घेतली आहे. मान्सूनचा दक्षिण, मध्य व उत्तर हिंदुस्थानातील प्रवासाचे नवे महिने निश्चित केले जाणार आहेत. आकडेवारीची सरासरी काढून ऋतूंचे नवीन महिने अधिकृत हवामान खाते एप्रिलमध्ये घोषित करणार आहे.

मान्सूनच्या आगमन व परतीचे वेळापत्रक बदलल्याचा परिणाम अन्य दोन ऋतूंवरही होतो. हवामान विभाग ऋतूंच्या कालखंडाचाही अभ्यास करतो. तातडीने ऋतूंचे महिने बदलणार नाहीत. मात्र, मान्सूनचा प्रवेश व माघार याचा सध्या अभ्यास सुरू आहे. जगात 30 वर्षांच्या नोंदीद्वारे असे अभ्यास होतात. 1940 ते 1970, 1970 ते 2000 च्या नोंदींचा अभ्यास केला गेला. नंतर 2010 पर्यंतच्या नोंदी तपासल्या. आता आपल्याकडे 2020 पर्यंतची आकडेवारी आहे. 1970 ते 2020 पर्यंत काय व कसे बदल झाले याचा अभ्यास सध्या हवामान खात्याने सुरू केला आहे.
मान्सूनमधील बदल स्वीकारल्यास हवामान माहितीत अचूकता वाढू शकते. त्यामुळे त्याचा थेट फायदा शेतकरी जनतेला होणार आहे. त्यामुळे माझ्यासारख्या हवामानतज्ञांचे प्रयत्न व पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा आहे.

दरवर्षी 30 सप्टेंबरला अधिकृतपणे मान्सून संपल्याचे हवामान खाते जाहीर करते. 2019 मध्ये नाइलाजाने 16 ऑक्टोबरला नैऋत्य मान्सून हिंदुस्थानातून निघून गेला आहे, असे हवामान खात्याने जाहीर केले. परिणामी आता पाऊस येणार नाही असा शेतकऱयांचा समज झाला. पण 15 जुलैला महाराष्ट्रात सुरू झालेला पावसाळा 4 महीने म्हणजे 15 नोव्हेंबरपर्यंत बरसू शकेल असे सत्य हवामान खात्याने जाणूनबुजून शेतकऱयांपासून लपवून ठेवले. खरंतर वेळोवेळी कोणत्या तालुक्यात किती पाऊस होईल याचे इशारे दिले नाहीत. परिणामी महाराष्ट्रातील 325 तालुक्यांत शेतकरीवर्गाला योग्य अंदाज न आल्याने शेतातील उभी पिके अक्षरशः मातीमोल झाली. 92 लाखपेक्षा जास्त हेक्टर खरिपाची पिके महाराष्ट्रात पावसाने खराब झालीत. अपुऱया माहितीमुळे व खोटय़ा अंदाजामुळे यंदा शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

आज 80 वर्षांनंतर हवामान खात्याला जाग आली आहे. हवामान खात्याने 80 वर्षेपर्यंत चुकीचे परिमाण वापरून शेतकऱयांना दिलेले खोटे अंदाज यापुढे तरी थांबतील. गेल्या अनेक दशकांत देशाचे किती आर्थिक नुकसान झाले व किती शेतकऱयांनी आत्महत्या केल्या याची जबाबदारी हवामान खाते अप्रत्यक्षपणे घेत आहे असे यातून सूचित होते. परदेशी खासगी हवामान कंपन्याचे आगमन व शासकीय पातळीवर भारतीय हवामानशास्त्र विभागावर विश्वास न ठेवता हवामान माहितीची होणारी खरेदी या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा आहे. 1940 चे हवामानशास्त्र वापरू शकत नाही हे सांगून आपल्या गुन्हांची जणू कबुली हवामान खात्याने दिली आहे. ही आत्महत्याग्रस्त शेतकऱयांना श्रद्धांजलीच मानावी लागेल. यापुढे तरी अंदाजाची ‘शेती’ बंद होऊन खरीखुरी हवामान माहिती शेतकऱयांना मिळेल अशी आशा आहे.

गेल्या काही वर्षांतील हवामानाच्या नोंदी लक्षात घेता हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा या ऋतूंचे महिने अधिकृतपणे बदलले जाण्याची चिन्हे आहेत. हे बदल स्वीकारल्यास हवामान माहितीत अचूकता वाढू शकते आणि त्याचा थेट फायदा शेतकरी जनतेला होऊ शकतो.

(लेखक कृषी व हवामान अभ्यासक आहेत.)

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या