… तर 90 टक्क्यांहून अधिक बर्फाच्छादित हिमालय कोरडाठाक पडणार, चिंताजनक अहवाल प्रसिद्ध

वातावरण बदलाचे मोठे संकट जगासमोर आ वासून उभे ठाकले. वाढत्या प्रदुषणामुळे तापमानात वाढ होत असून याचा थेट परिणाम निसर्गावर होत आहे. अंटार्टिका, हिमालयातील बर्फ यामुळे वितळत आहे. अशातच एक नवा चिंताजनक अहवाल समोर आला आहे. जर देशाचे तापमान 3 अंश सेल्सियल वाढले तर बर्फाच्छादित असणारा हिमालय 90 टक्के कोरडाठाक पडेल. यामुळे मैदानी भागात पूर येऊन आगामी काळात पिण्याच्या आणि सिंचनासाठीच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते.

अहवालात नमूद केल्याप्रमाणे सध्या हिंदुस्थानातील 80 टक्के नागरिक उष्माघाताचा सामना करत असून यावर नियंत्रण मिळवायचे असेल तर पॅरिस कराराप्रमाणे तापमान वाढ दीड अंशांपर्यंतच रोखावी लागेल. तापमानात 3 अंश सेल्सियस वाढ झाल्यास बिकट परिस्थिती निर्माण होईल. इंग्लंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ इंडिया अँग्लियाच्या संशोधकांच्या नेतृत्वाखाली याचा अभ्यास करण्यात आला आहे. संशोधकांनी आठ वेगवेगळ्या अभ्यासांची सांगड घालत नवा अहवाल तयार केला आहे. यासाठी हिंदुस्थान, ब्राझिल, चीन, इजिप्त, इथिओपिया आणि घाना या देशांवर लक्ष केंद्रीय करण्यात आले आहे. वातावरणातील बदल, जागतिक तापमानवाढ आणि वाढत्या तापमानामुळे या देशांमध्ये दुष्काळ, पूर, अन्न-धान्याची कमतरता आणि जैवविविधतेला धोका अशा समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

तापमानामध्ये 3 ते 4 अंश सेल्सियस वाढ झाली तर हिंदुस्थानातील पर्जन्यमान निम्म्याने कमी होईल. तापमानत दीड अंश सेल्सियसने वाढले तर पर्जन्यमान एक चतुर्थांशने मी होईल. याचा थेट परिणाम शेतीवर होणार असून लागवड क्षेत्र घटेल. त्यामुळे अन्न-धान्याचे उत्पादनही कमी होईल. पर्जन्यमान घटल्याने देशातील काही भागांना भयंकर दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो. असा दुष्काळ सहसा 30 वर्षांतून एकदा येतो. मात्र तापमान वाढीला दीड अंश सेल्सियसपर्यंत आळा घातल्यास भयंकर दुष्काळापासून वाचता येईल. अर्थात वर उल्लेख केलेल्या देशातील शेतजमिनी कोरड्या पडतील, पण कमी प्रमाणात, असेही अहवालात नमूद केले आहे.

तापमानामध्ये दीड अंश सेल्सियसपर्यंत वाढ झाली तर हिंदुस्थानातील 21 टक्के आणि इथियोपियातील 61 टक्के शेतजमीन कोरडीठाक पडेल. एवढेच नाही तर 20 ते 80 टक्के लोकसंख्येला या दुष्काळाचा सामना करावा लागेल. मात्र हेच तापमान 3 अंश सेल्सियसपर्यंत वाढले तर संकट गडद होईल. याचा परिणाम दुप्पट होईल. याचा थेट फटका मानवासह झाडे, वनस्पती आणि पृथ्वीवरील प्राण्यांवर होईल. त्यामुळे या देशांनी हरीतक्षेत्र वाढवण्यावर भर द्यायला हवा.

दरम्यान, हिंदुस्थानला तापमान वाढीमुळे होणारी नैसर्गिक आपत्ती टाळायची असेल तर पॅरिस करारावर तातडीने पावले उचलावी लागतील. तरच मानवासह सर्व जिवांना वाचवण्यात यश येईल. अर्थात हिंदुस्थानची यापासून पूर्णपणे वाचेल असे नाही, असे युनिव्हर्सिटी ऑफ इंडिया अँग्लियाचे प्रोफेसर रेचेल वॉरेन यांनी सांगितले. या तापमान वाढीवर दोन प्रकारे काम करता येईल. एक म्हणजे वातावरण बदलानुसार त्यात रुळण्यासाठी स्वत:ला विकसित करणे आणि दुसरे म्हणजे कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन वेगाने कमी करणे, असेही त्यांनी स्पष्ट केले.