
गेल्या काही दिवसांपासून चाळिशीपार असणाऱया पुण्याच्या पाऱयामध्ये गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने घट होत असून, पुढील चार ते पाच दिवस पुण्यासह राज्याच्या बहुतांश भागांत ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे नागरिकांना उकाडय़ापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवस बऱयाच भागांतील तापमान 37 अंशांच्या वर गेले होते. राज्यात मंगळवारी सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूर येथे 45.2 अंश, तर सर्वांत कमी महाबळेश्वर येथे 30.8 अंश सेल्सिअस एवढी झाली.
राज्यामध्ये एकीकडे काही शहरांतील तापमानाच्या पाऱयात सातत्याने वाढ होत असताना दुसरीकडे काही भागांमध्ये अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. उद्या विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि वाशिम जिह्यांतील काही भागामध्ये मेघगर्जना, वादळी वाऱयासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ातदेखील तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता असून, यलो अलर्ट देण्यात आला आहे. 5 मे नंतर राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ासह विदर्भातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून, मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
प्रमुख शहरांतील तापमान
मुंबई 34.3, रत्नागिरी 34.4, पुणे 37.9, नगर 43.9, जळगाव 43.4, कोल्हापूर 36.6, महाबळेश्वर 30.8, मालेगाव 44.2, नाशिक 37.3, सांगली 37.4, सातारा 37.9, सोलापूर 42.7, संभाजीनगर 40.6, परभणी 43.1, नांदेड 43.2, अकोला 44.8, अमरावती 42.6, नागपूर 43.3.
























































