Kabaddi मुंबई, पुणे, नगरमध्ये अंतिम फेरीची रंगत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

महाराष्ट्राची आतापर्यंतची सर्वात मोठी क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा असलेल्या ‘सीएम चषक’चे राज्यस्तरीय अंतिम सामने मुंबई, नगर आणि पुण्यात पार पडतील. राज्यातील सर्व जिह्यांतून एकूण 45 लाखांहून अधिक स्पर्धकांनी ‘सीएम चषक’च्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. आमदार योगेश टिळेकर आणि मोहित भारतीय यांच्या नेतृत्वात ‘सीएम चषक’च्या समारोपाची तयारी सुरू आहे. क्रिकेटचा राज्यस्तरीय अंतिम सामना नगरमध्ये 29 जानेवारी (मंगळवार)पासून सुरू होणार आहे. ‘सीएम चषक’चा सांगता सोहळा 3फेब्रुवारीला पार पडेल. यामध्ये राज्यातील सुमारे 35 हजारांहून जास्त तरुण-तरुणी भाग घेण्यासाठी मुंबईत येतील.

’सीएम चषक’ स्पर्धेत क्रीडा आणि सांस्कृतिक अशा एकूण 12 स्पर्धांमध्ये गाव, गल्ली आणि सोसायटय़ांसहित प्रत्येक शाळा, कॉलेज आणि विधानसभा तसेच जिल्हास्तरांवर 8,02,071 सामने आयोजित करण्यात आले. या स्पर्धा एकूण 1,91,911 तासांपर्यंत चालल्या. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात सरासरीने 15,000 स्पर्धकांनी ’सीएम चषक’च्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला, ज्यात राज्यस्तरावर एकूण 37,000 स्पर्धक विजेते घोषित झाले. जिल्हा स्तरावर 5000 स्पर्धक विविध स्पर्धांमध्ये विजेते झाले. राज्यस्तरावर एकूण 129 विजेते घोषित होतील. स्पर्धेच्या अंतिम समारोप सोहळ्यात महाराष्ट्र स्तरावरच्या विजेत्यांना 28 लाखांची पारितोषिके प्रदान केली जातील.

विधायक टिळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ’सीएम चषक’मधील क्रिकेटचे राज्यस्तरीय अंतिम सामने 29 ते 31 जानेवारीपर्यंत नगरमध्ये आणि कुस्तीचे राज्यस्तरीय सामने पुण्यात 31 जानेवारी रोजी होतील. व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी, कॅरम, ऍथलेटीक्स, रांगोळी, पेंटिंग, गायन आणि नृत्य स्पर्धांचे अंतिम सामने 2 व 3 जानेवारीला मुंबईत होतील. या सर्व स्पर्धांच्या अंतिम फेरीतल्या सामन्यांसाठी मुंबई, नगर आणि पुणे सज्ज झाले आहे.