डबेवाल्यांना शाळांमध्ये डबे पोहोचवण्याच्या परवानगीसाठी बैठक, मुख्यमंत्र्यांच्या सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईतल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना सकस जेवण मिळण्यासाठी मुंबईच्या डबेवाल्यांना शाळेत डबे पोहोचवण्यास परवानगी देण्याबाबत पोलिस आयुक्त व शिक्षण उपसंचालकांनी तातडीने बैठक घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

सुरक्षेच्या कारणासाठी मुंबईच्या डबेवाल्यांना शाळांमध्ये प्रवेश देण्यास शिक्षण संस्थांच्या व्यवस्थापनाने बंदी घातल्याचे पुढे आले आहे. या बंदीबाबत मुंबई भाजप अध्यक्ष व आमदार ऍड. आशीष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन यात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. मुंबईतील डबेवाले सुमारे रोज 2 लाख लोकांना डबे पोहचविण्याचे काम मेहनतीने व अत्यंत प्रामाणिकपणे करतात. त्यामुळे त्यांना शाळेत डबे देण्यास बंदी घालणे ही बाब अन्यायकारक आहे. शाळांनी मुलांच्या सुरक्षेची काळजी जरूर घ्यावी,मात्र शाळांमध्ये अन्य सेवा देणाऱयांना ज्या पद्धतीने परवानगी देण्यात येते त्याच पद्धतीने डबेवाल्यांची सेवाही सुरू ठेवण्यात यावी अशी विनंती शेलार यांनी मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना केली.

त्यावर पोलीस आयुक्तांनी तातडीने शाळा,डबेवाले यांच्याशी संयुक्त बैठक घेऊन यावर तोडगा काढावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.