
सामना ऑनलाईन । पंढरपूर
केंद्र आणि राज्य सरकारने दबावतंत्राचे राजकारण केले असते तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील निम्मे लोक भाजपमध्ये आले असते. मात्र आम्ही तसे केले नाही. उलट भाजपच्या कार्यावर फिदा होऊन जे लोक स्वतःच्या मर्जीने येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला.
पंढरपूर तालुक्यातील वाडीकुरोली येथे काँग्रेस नेते कल्याणराव काळे यांच्या भाजपप्रवेशाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी काळे यांच्यासमवेत पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष दगडूशेठ धोडके, माजी नगराध्यक्षा सुरेखा पवार यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. तर जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रकाश देशमुख यांनी भाजपला पाठिंबा दिला.
पवारांना जे करता आले नाही ते मोदींनी केले
शरद पवार हे गेली 10 वर्षे केंद्रात असतानाही त्यांना कृषी क्षेत्रात जे करता आले नाही ते मोदी सरकारने करून दाखवले. टेंभू, म्हैसाळ, उमरोडी यांच्यासह अनेक सिंचन प्रकल्पांना निधी दिल्यामुळे ही कामे प्रगतिपथावर आहेत. शेतकऱयांच्या एफआरपीची रक्कम मिळावी म्हणून कारखान्यांना पॅकेज दिले. दरम्यान, टीमचा कॅप्टन मैदान सोडून गेल्यावर जशी अवस्था होते तशीच अवस्था राष्ट्रवादीची माढय़ात झाल्याचा चिमटाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढला.


























































