
दोन्हीही काँग्रेसने कितीही यात्रा काढल्या तरीही त्यांची माजोरी व मुजोरी व जनतेला माहित असल्याने येणाऱ्या निवडणुकीत मतदार दोन्हीही काँग्रेसला थारा देणार नसल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. महाजानदेश यात्रेनिमित्त बाजार समितीच्या आवारात आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर पालकमंत्री राम शिंदे, खासदार डॉ. सुजय विखे, आमदार मोनिका राजळे, शिवाजी कर्डीले, बाळासाहेब मुरकुटे, वैभव पिचड, माजी खासदार दिलीप गांधी, माजीमंत्री बबनराव पाचपुते, सुरजितसिंह ठाकूर यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, या तालुक्यात आलो की स्व. गोपीनाथ मुंडे व स्व. राजीव राजळे यांची आठवण येते. कोणत्याही यात्रेचे एक दैवत असते. मी काढलेल्या यात्रेचे दैवत हे राज्यातील जनता असून आज पर्यंत केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी व जनतेशी संवाद साधण्यासाठी महाजनादेश यात्रा काढलेली आहे. या यात्रेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून दोन्हीही काँग्रेसच्या यात्रेकडे मात्र जनतेने पाठ फिरवली आहे.
तसेच ते पुढे म्हणाले की, आपल्या अपयशाचे खापर ईव्हीएम मशीन फोडणाऱ्यांना हे समजत नाही की ईव्हीएम मशीन हे 2004 ला देशात आले व 2014 पर्यंत त्यांचीच सत्ता होती. त्या वेळी ईव्हीएम मशीन खराब नव्हते मात्र भाजप जिंकायला लागला तर लगेच ईव्हीएम मशीन खराब कसे काय झाले? सुप्रिया सुळे जिंकल्या तेव्हा मशीन खराब नाही मात्र डॉ. सुजय विखे जिंकले तर हे मशीन खराब कसे झाले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. परीक्षेला नापास झालेल्या मुलाने पेन खराब होता म्हणून आपण नापास झालो असे विरोधकांचे वागणे असून येणाऱ्या 25 वर्षात आमची सत्ता हटणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


























































