
राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धक्कातंत्राच्या तयारीत आहेत. महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल केले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये आठ वादग्रस्त आणि दिग्गज मंत्र्यांची विकेट काढून नव्या चेहऱयांना संधी दिली जाईल. भाजपच्या दोन दिग्गजांबरोबर शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या काही मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखविला जाईल, अशी चर्चा आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला मोठे यश मिळाले, मात्र राज्यात सरकार आल्यानंतर महायुतीचे काही मंत्री आणि आमदारांच्या वादग्रस्त भूमिका आणि वर्तनामुळे जनमानसात चुकीचा संदेश जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या 100 दिवसांच्या कार्यक्रमात काही मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याचे आढळून आले आहे. हे लक्षात राज्य मंत्रिमंडळात खांदेपालट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही इतर पक्षांतील दिग्गजांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांना मंत्रिमंडळात घेतले जाईल, असे बोलले जात आहे.
शिंदे गटाच्या यांना नारळ
शिंदे गटाच्या तीन ते चार मंत्र्यांना संभाव्य फेरबदलात नारळ दिला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये वादग्रस्त ठरलेले सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, रोहयो मंत्री भरत गोगावले, शिक्षणमंत्री दादा भुसे, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना नारळ दिला जाण्याची शक्यता आहे.
अजितदादा गटाच्या कोकाटेंवर टांगती तलवार
संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांचा आधीच राजीनामा झालेला आहे. त्यापाठोपाठ आता सातत्याने वादग्रस्त ठरणाऱया माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार असल्याची चर्चा आहे. नरहरी झिरवळ यांच्यावरही मंत्रिपद गमावण्याची नामुष्की येऊ शकते.
नितेश राणे, जयकुमार गोरेंना धोका
भाजपकडून मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेल्या मत्स्यविकास मंत्री नितेश राणे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची वादग्रस्त पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांच्या मंत्रिपदाला धोका निर्माण झाला आहे. भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेल्या गिरीश महाजन यांना पक्षाची गरज म्हणून मंत्रिमंडळाबाहेर थांबण्यास सांगितले जाऊ शकते.
विधानसभा अध्यक्षपदासाठी मुनगंटीवार यांची चर्चा
फेरबदलात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची मंत्रिपदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी भाजपमध्ये सध्या नाराज असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांची वर्णी लागण्याची चर्चा आहे.
































































