
अवाढव्य खर्च करून शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर उभारलेला आलिशान मंडप… आतमध्ये बसण्यासाठी महागडे कोच आणि खुर्च्या… भव्य व्यासपीठ… मंडपातच जागेवर चहापाणी आणि नाश्त्याची व्यवस्था… अशी सगळी ‘फाइव्ह स्टार’ व्यवस्था असूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘महारेल’च्या कार्यक्रमाचा फज्जा उडाला. अवघ्या दीडशे-दोनशे लोकांची उपस्थिती असल्याने कार्यक्रमाला रिकाम्या खुर्च्यांची गर्दी झाली होती.
पोलीस मुख्यालयातील भरती झालेले प्रशिक्षणार्थी रिक्रुट महिलांना खुर्च्यांवर आणून बसविले तरीदेखील 60 ते 70 टक्के खुर्च्या रिकाम्या असल्याने अखेर घाईघाईने कामगारांना बोलून प्लॅस्टिकच्या निम्म्यापेक्षा अधिक खुर्च्या उचलून बाजूला ठेवण्यात आल्या. त्यानंतर कापडी आवरण असलेल्या निम्म्या खुर्च्या उचलून बाजूला नेण्यात आल्या. काही पोलीसदेखील खुर्च्यांवर बसून होते.
‘महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’च्या वतीने उड्डाणपुलांचे लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सव्वा तास उशिरा आले. पेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ऑनलाइन उपस्थिती होती. तरीदेखील मंडप रिकामा होता. व्यासपीठावर मान्यवरांसाठी खुर्च्या मांडल्या होत्या; परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला अनुपस्थित होते. पालकमंत्री, एक खासदार आणि एक आमदार वगळता, कोणीही लोकप्रतिनिधी नसल्याने अखेर व्यासपीठावरील मोकळ्या खुर्च्यांवर अधिकाऱयांना आणून बसविले.
पावसावर खापर
कार्यक्रमाला लोकांची अनुपस्थिती आणि उडालेला फज्जा याबद्दल ‘महारेल’चे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जयस्वाल यांनी पाऊस झाल्यामुळे आणि पावसाळी वातावरणाचा हा परिणाम असल्याची सारवासारव केली. प्रत्यक्षात मुख्यमंत्री आले तेव्हा पाऊस नव्हता. मात्र, या संपूर्ण कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्यांची चर्चा होती. सरकारी यंत्रणांकडूनदेखील गर्दी का झाली नाही? याची विचारणा अधिकाऱयांना होत होती.
गद्दारांना हिसका!
गद्दारांना ठिकठिकाणी जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. मराठवाडय़ात रविवारी तीन गद्दारांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली. हिंगोलीत ‘वाळू’फेम आमदार संतोष बांगर यांच्या प्रतिमेला शिवसैनिकांनी जोडे मारले तर गेवराईत तलवाडा फाटा येथे गद्दार मंत्री संजय राठोड यांचा ताफा बंजारा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी अडवला. बंजारा समाजाचे प्रश्न कधी सोडवणार, असा जाब कार्यकर्त्यांनी विचारताच संजय राठोड यांची बोलतीच बंद झाली.































































