
महापालिका निवडणुकीच्या प्रचार शुभारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सांगलीत आले. अवघ्या 15 मिनिटांच्या भाषणात त्यांनी घोषणांचा पाऊसच पाडला. कवलापूर विमानतळ, सांगलीत आयटी क्षेत्र, महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत, महापूर रोखण्यासाठी 591 कोटींच्या पहिल्या टप्प्याचे काम लवकरच सुरू, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, मिरजेत ‘म्युझिक हेरिटेज पार्क’ उभारू, अशा घोषणा करून ते इचलकरंजीकडे रवाना झाले. भाजपच्या या प्रचार सभेला सांगलीकरांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला.
सांगली महापालिकेच्या निवडणुकीत भाजप स्वतंत्रपणे सर्वच्या सर्व 78 जागा लढवत आहे. या निवडणुकीच्या प्रचार शुभारंभ आज सांगलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी स्टेशन चौकात जाहीर सभा झाली. सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगलीकरांसमोर घोषणांचा पाऊस पाडला. ‘महापालिकेची सत्ता द्या, या शहराचा कायापालट करतो,’ असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘सांगलीकरांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी ‘वारणा उद्भव’ या 450 कोटी खर्चाच्या योजनेला तातडीने मान्यता देऊ. कायम भेडसावणारा महापूर आणि पुराचा प्रश्न सोडविण्यासाठी जागतिक बँकेच्या मदतीने दोन टप्प्यांत चार हजार कोटी रुपये खर्चाच्या योजनेच्या माध्यमातून सांगलीकर नागरिकांवरील हा पुराचा धोका कायमचा टाळू. हे महापुराचे पाणी मराठवाडा व महाराष्ट्रातील इतर भागांकडे वळवून शेतकऱयांच्या शेतीला पाणी देण्याचा प्रयत्न या योजनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यासाठी 590 कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्याचे काम लवकरच सुरू करीत आहोत. महापालिकेची नवी अद्ययावत भव्य प्रशासकीय इमारत उभारली जाईल, त्यासाठी निधी देऊन नव्या इमारतीचे कामही लवकरच सुरू करू,’ असे ते म्हणाले. तसेच ‘महापालिका क्षेत्रात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, सांगली शहरात आयटी क्षेत्र विकसित करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू, शहरानजीक कवलापूर येथे विमानतळ उभारू, ट्रक टर्मिनस आणि मिरजेत ‘म्युझिक हेरिटेज पार्क’ही उभे करू
आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. ‘काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षांना 78 उमेदवार मिळू शकलेले नाहीत, ते या शहराचा काय विकास करणार?’ असा सवाल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला.
इचलकरंजीला पिण्याचे पाणी देण्याची पुन्हा घोषणा
‘इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवू आणि विकास प्रकल्पासाठी निधी देऊ,’ अशी पुन्हा एकदा घोषणा करीत नारायण चौकातील सभेत ‘विकासाच्या कामावर आम्ही मते मागत आहोत,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले. यावेळी आमदार राहुल आवाडे, खासदार धैर्यशील माने, माजी मंत्री प्रकाश आवाडे, सुरेश हाळवणकर आदी उपस्थित होते.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 195क्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव असलेल्या सातारा जिल्ह्यातील नायगाव येथील स्मारकास शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री जयकुमार गोरे, आमदार अतुल भोसले, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीसप्रमुख तुषार दोशी आदी उपस्थित होते. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून आलेल्या हजारो लोकांच्या स्वागतासाठी नायगावनगरी सडा-रांगोळीने सज्ज झाली होती.
























































