मैदानात उतरायला पैलवानच नाही! मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

382


निवडणुकीचा निकाल लागलेलाच आहे. पुढे मैदानात उतरायला पैलवानच नाही. कोण तेल लावायलाही तयार नाही आणि आखाडय़ात उतरायलाही तयार नाही. त्यामुळे ही संघर्ष यात्रा नाही, तर संवाद यात्रा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. छत्रपतींनी मागण्या करायच्या नाहीत, तर आदेश द्यायचा. त्यांच्या मागण्या हा मावळा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा रविवारी सातार्‍यात दाखल झाली. शहरातून भव्य रॅली काढल्यानंतर सैनिक स्कूल मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, संजय काकडे, आमदार बाळा भेगडे, कांताताई नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

छत्रपतींच्या घराण्याकडून तुम्ही जितके घेतले, त्याच्या एक दशांश तरी त्यांना दिलेत का, असा खरमरीत सवाल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर नामोल्लेख न करता हल्ला चढवला. छत्रपतींचे घराणे हे देणारे घराणे आहे, घेणारे नाही. तुम्ही त्यांना काही दिलेही नाही आणि त्यांनी कधी काही मागितलेही नाही. असे असताना त्यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे उत्तर महाराष्ट्रातील जनता तुम्हाला देईल, असे त्यांनी ठणकावले. दोन्ही महाराज कोणती अट टाकून भाजपमध्ये आलेले नाहीत. एकही वैयक्तिक काम घेऊन ते आले नाहीत तर लोकहिताच्या कामांसाठी आले आहेत, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

उदयनराजे भोसले यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादीवर तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर मिश्किल शैलीत टीका केली. काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार सत्तेत असतानाही एक रुपयाचे काम झाले नाही. जी कामे झाली ती रेटून केली म्हणून झाली. प्रत्येक वेळी नळावरच्या भांडणासारखे भांडावे लागले. लोकांच्या हिताच्या कामाची फाईल घेऊन मंत्र्यांकडे गेलो, तर आमच्या नावावर तिथे फुलीच होती. आमची फाईल तिथे डस्टबीनमध्ये जायची. उलट युती सरकारच्या काळात विरोधी खासदार असूनही मुख्यमंत्री व गिरीश महाजन यांनी सातार्‍यासाठीची कोटय़वधीची कामे मार्गी लावली, असे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या