
सामना प्रतिनिधी । बीड
मराठवाड्यातील दुष्काळ भीषण आहे. या दुष्काळातून मराठवाड्याला बाहेर काढण्यासाठीच जलयुक्त शिवार योजना राबवली गेली. या योजनेचे महत्त्व भविष्यात दिसेल. दुष्काळाचा सामना करण्यासाठी सरकार सर्वोतपरी प्रयत्न करत आहे. दुष्काळाचे आव्हान मोठे असले तरी सरकारची इच्छाशक्तीही दांडगी आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडमध्ये सांगितले.
बीडमध्ये नगरपालिकेच्या 495 कोटी रूपयांच्या विकास कामांचा शुभारंभ आणि उद्घाटन करण्यासाठी ते आले होते. या विकासकामांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते तर पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार जयदत्त क्षीरसागर, सुरेश धस, आर.टी.देशमुख,भीमराव धोंडे, संगिता ठोंबरे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठवाड्यात सततचा दुष्काळ आहे. आधीचे सरकार दुष्काळ अनुदान एप्रिल-मे मध्ये देत असे. आम्ही मात्र केंद्र सरकारला आग्रह करून ऑक्टोबर महिन्यात दुष्काळ जाहीर केला. तातडीने पथकाने पाहणी केली आणि बीड जिल्ह्याच्या वाट्याला 600 कोटी रूपयाचे अनुदान मिळाले आहे. हे 600 कोटी रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा होणार आहेत. ते ही मार्च महिन्याच्या आत. दुष्काळात शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले जाणार आहे. 75 हजार कोटी शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. दरवर्षी त्यांच्या खात्यात हे अनुदान येणार आहे. जनावरे जगवली पाहिजेत त्यासाठीच चारा, छावण्या उघडल्या जाणार आहेत. या चारा छावण्यांचा उपयोग जनावरांसाठी झाला पाहिजे. छावण्या कोणासाठी कुरण ठरू नये याची खबरदारी सरकार घेत आहे. अन्नधान्याच्या बाबतीतही नियोजन केले जात आहे. अधिकचा नियतन आम्ही उपलब्ध करणार आहोत. असेही त्यांनी सांगितले. बीड नगर पालिकेच्या पाठीशी आम्ही खंबीर उभे राहू, विकासासाठी नगर पालिका जो आराखडा पूर्ण करेल तो मार्गी लावण्याचे काम भविष्यात आम्ही करणार आहोत. बीड जिल्हा स्व.गोपीनाथराव मुंडेंचा जिल्हा आहे. त्याचा सर्वांगिण विकास करणे हे आमचे कर्तव्य आहे असे ते म्हणाले.
पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, निसर्गाचा दुष्काळ असला तरी विकासनिधीचा मात्र पाऊस पडत आहे. विकासात आम्ही राजकारण कधीच केले नाही. आम्ही घरफोडण्याचे पापही कधी केले नाही. घर फुटल्यानंतर काय त्रास होतो तो मी अनुभवला आहे. असे त्यांनी सांगितले. जयदत्त क्षीरसागर, सुरेश धस यांनीही भाषणे केली. प्रास्ताविक नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांनी केले.


























































