चला, पालिकेच्या हेरिटेज सफरीला! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा कारभार हाकला जाणाऱ्या महानगरपालिका मुख्यालयाच्या हेरिटेज इमारतीची सफर आता मुंबईकर-पर्यटकांना करता येणार आहे. पालिकेच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 28 जानेवारी रोजी होणार आहे. यामुळे गॉथिक शैलीतील 150 वर्षाच्या इमारतीचा ऐतिहासिक वारसा उलगडला जाणार आहे. शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी हा ‘हेरिटेज वॉक’ मिळणार आहे.

स्वप्ननगरी मुंबईचा कारभार चालणाऱ्या पालिकेच्या मुख्यालयाची ऐतिहासिक इमारत फोर्ट येथे आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळच असणाऱ्या या देखण्या वास्तूचा मोह मुंबईकर-पर्यटकांना नेहमीच असतो. इमारतीसमोर फिरोजशहा मेहता यांचा पुतळा आहे तर समोरच सेल्फी पॉईंट आहे. त्यामुळे अनेक जण या ठिकाणी आल्यानंतर पालिकेच्या भव्य इमारतीचा फोटो काढल्याशिवाय पुढे जात नाही. पालिकेची ही हेरिटेज इमारत देश-विदेशातील पर्यटकांसाठीही आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिली आहे. त्यामुळे या वास्तूचे पर्यटन घडावे यासाठी पालिका आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्यक्षात ही हेरिटेज इमारत पर्यटनासाठी खुली होणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 28 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर किशोरी पेडणेकर, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री मंत्री अस्लम शेख, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

असे आहे इमारतीचे आकर्षण

  • गॉथिक शैलीत असणारी पालिकेची ही इमारत चार मजल्यांची असून दगडी कामातून तयार करण्यात आलेली आहे. गॉथिक शैलीतील हे काम जागतिक वारसा असलेल्या वास्तूंमध्ये मोडते. या इमारतीबरोबरच पालिकेची सहा मजली विस्तारित इमारतही आहे.
  • मुख्यालयाच्या इमारतीत पालिका आयुक्तांचे कार्यालय असून विविध महत्त्वाच्या समित्यांची सभागृहे आहेत. यात मुंबईतील 232 नगरसेवकांसाठी असलेले मुख्य सभागृह, त्यातील महापुरुषांचे पुतळे, स्थायी समिती, शिक्षण समितीचे सभागृह आहे.

गाईडच्या माध्यमातून ‘हेरिटेज वॉक’

ही इमारत पर्यटनासाठी खुली झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या धर्तीवर गाईडच्या मदतीने पर्यटकांना पाहता येणार आहे. यावेळी पर्यटकांना गाईडच्या माध्यमातून इमारतीचा इतिहास, आताचे महत्त्व सांगितले जाईल. दरम्यान, हेरिटेज वास्तू असल्यामुळे महापौर तसेच पालिका आयुक्तांच्या दालनांसह अनेक प्रशस्त दालने आहेत. आधुनिकतेचा साज म्हणून इमारतीत लिफ्ट आणि वातानुकूलित यंत्रे बसवण्यात आली आहेत. मात्र, वास्तूच्या कोणत्याही रचनेत बदल न करता ही वास्तू जपण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या