नितीनजी, तुम्ही करून दाखवलं! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले कौतुक

मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी लागणारा वेळ व वाहतूककोंडी पाहून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी युती सरकारच्या काळात नितीन गडकरी यांना बोलावून मुंबई-पुणे अंतर दोन तासांत पूर्ण व्हायला पाहिजे असे सांगितले. त्यावर तुम्ही तत्काळ हो म्हणालात आणि तुम्ही करून दाखवलेत. आता तीच ओळख देशपातळीवर तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने निर्माण करीत आहात, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक केले.

नागपूर येथील कडबी चौक ते गोळीबार चौकदरम्यान नवीन रेल्वे उड्डाणपुलाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झाले. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे सार्वजनिक मंत्री अशोक चव्हाण व अन्य नेते उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई-पुणे एक्प्रेस वे बांधण्याच्या संदर्भात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केलेली इच्छा व हा मार्ग कशा प्रकारे पूर्ण झाला याची आठवण सांगितली. ते म्हणाले,  जेव्हा आपले युतीचे सरकार महाराष्ट्रात आले तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना बोलावून एक इच्छा व्यक्त केली. मला मुंबई-पुणे सरळ रस्ता पाहिजे. हा प्रवास दोन तासांत पूर्ण झाला पाहिजे असे शिवसेनाप्रमुखांनी सांगितले. मूळात स्वप्न पहायला धाडस असायला लागते. आणि स्वप्न प्रत्यक्षात आणणे हे महाकर्मकठीण. काम करायला अधिक मोठे धाडस लागते. तुमच्या जागी दुसरा कोणी असता तर कसे शक्य आहे ते बघतो असे म्हणाला असता पण तुम्ही तत्काळ हो म्हणालात आणि करून दाखवलेत याबद्दल नितीनजी, मला तुमचा अभिमान आहे असे गौरवोदगार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले.

कोकण व पश्चिम महाराष्ट्रावर आलेल्या नैसर्गिक आपत्तीचा धागा पकडून राज्यातील रस्ते व पुलांच्या मजबुतीकरणासाठी तुमची मदत अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्र्यांनी  नितीन गडकरी यांना सांगितले. नागपूरमधील नागभिडमध्ये नॅरोगेज  रेल्वे मार्ग ब्रॉडगेज करण्याच्या प्रकल्पाचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यासाठी व देशासाठी कुठेही राजकीय अडथळे येऊ न देता विकासासाठी काम करीत आलो आहोत ही आपली संस्कृती आहे. ही संस्कृती आपण जपत पुढे नेऊ. केंद्र व राज्याच्या सहकार्याचा मार्ग नॅरोगेज न राहता ब्राँडगेज असावा अशी अपेक्षाही  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

 

आपली प्रतिक्रिया द्या