बारा लाख आदिवासी कुटुंबीयांच्या बँक खात्यात खावटीची रक्कम जमा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डिजिटल शुभारंभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या संकटामुळे जगण्यावर निर्बंध आले, अर्थचक्र मंदावले आणि रोजीरोटीवर परिणाम झाला. याचे दुष्परिणाम शहराबरोबर ग्रामीण व आदिवासी भागातही होत आहेत. म्हणूनच आदिवासी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी खावटी योजना सुरू केली असून आज एकाच वेळी बारा लाख कुटुंबांच्या बँक खात्यात खावटी अनुदानाची रक्कम जमा होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली.

राज्य सरकारने आदिवासी बांधवांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजअंतर्गत खावटी अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना थेट अनुदान वाटपाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त ऑनलाइन पद्धतीने झाला. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा आहे. या जिह्यालाही आपण भेट दिल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, पालघर असो, चंद्रपूर असो, नंदुरबार असो हा सगळा भाग जंगलात वसला आहे. येथे निसर्गसौंदर्य आहे. आदिवासींजवळ जगाला भुरळ पाडणारी स्वतःची कला आणि संस्कृती आहे. याचा उपयोग करून आदिवासी भागाचा विकास करण्याच्या दृष्टीने सरकार येथील पर्यटनाला चालना देत असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आदिवासी विकासमंत्री अॅड. के. सी. पाडवी, आमदार सुनील भुसारा व विनोद निकोले उपस्थित होते.