मुंबईत 24 तासात मुसळधार पावसाचा अंदाज; महापालिकेला सतर्क राहण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

1093

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार दोन दिवस मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यात तुफान पाऊस कोसळला आहे. हवामान विभागाने या चार जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला होता. आता आगामी 24 तासातही मुंबईसह पश्चिम किनारपट्टीच्या भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई शहरात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला आणि महापालिकेसह सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

मुंबई आणि परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी आढावा घेतला. मुंबई महानगरपालिका आणि इतर यंत्रणांना अधिक सतर्क राहण्याबाबत त्यांनी सूचना केल्या आहेत. मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस पावसाने मुंबईला झोडपून काढले. पावसासह सोसाट्याने वाऱ्याने काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. तर सखल भागात पाणी साचले होते. आता गुरुवारीही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी आणि अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजनुसार सर्व यंत्रणांनी केलेल्या उपाययोजनांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. महापालिका, पोलीस, रेल्वे,आरोग्य यंत्रणा तसेच एनडीआरएफ यांनी समन्वयाने परिस्थिती हाताळावी अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. अतिवृष्टीमुळे होणारी नागरिकांची गैरसोय दूर करावी, वीज पुरवठा खंडित होणे, झाडे पडणे, सखल भागात साचलेले पाणी याविषयी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. शहरात ठिकठिकाणी सुरू असलेलेल्या मेट्रो कामांच्या ठिकाणी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सजग राहून कुठलीही दुर्घटना होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या