बीड जिल्ह्यात ऑक्सिजन, औषधांची कमतरता भासणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मराठवाड्यातील कोविड परिस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत बीड जिल्ह्यातील कोरोनाबाबतच्या समस्यांकडे जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांचे लक्ष वेधले. यावेळी ऑक्सिजनचा मागणीनुसार पुरवठा करणे, रेमडीसीवर इंजेक्शनची मुबलक प्रमाणात उपलब्ध करणे, यासह कोविड रोखण्यासाठी अधिकच्या निधीबाबत सकारात्मक चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक आणि महत्वाचे अधिकारी उपस्थित होते.

बीड जिल्ह्यातील आरोग्यविषयक उपाययोजनांचा आढावा सादर करून जिल्ह्यातील सद्यस्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती देण्यात आली. बीड जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा मागणीपेक्षा काही प्रमाणात कमी असून रेमडीसीवर या महत्त्वाच्या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याचे सांगण्यात आले. फॅबीफ्लूसह अन्य औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्यासह अन्य सर्वसमावेशक बाबींवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. बीड जिल्ह्यातील प्रतिरुग्ण कॉन्टॅक्ट ट्रेसिंग रेशो विभागात अव्वल असून कोरोनामुक्तीचे प्रमाणही 70 टक्क्यांच्या घरात आहे, याबाबत मुख्यमंत्र्यांनी बीड जिल्ह्यातील सर्वच कोरोना योद्ध्यांचे यावेळी कौतुक केले.

येत्या काही दिवसात जिल्ह्याभरात व राज्यात राबविण्यात येत असलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानात प्रत्येक घटकाने सर्व क्षमतेने आपले योगदान देऊन हे अभियान यशस्वी करावे व कोरोनाला हरवण्यासाठी सज्ज व्हावे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या मागणीनुसार ऑक्सिजन पुरवठा तसेच रेमडीसीवर इंजेक्शन व अन्य औषधे तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत संबंधितांना निर्देश दिले असून बीड जिल्ह्याच्या आरोग्यविषयक योजनांसाठी अधिकचा निधी उपलब्ध करून देण्यास सरकार सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या