मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आश्वासन; महाराष्ट्राला पूर्ण सहकार्य करणार!

1565

महाराष्ट्राला केंद्र सरकार पूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले. महाराष्ट्र आणि केंद्र सरकार यांच्यात निश्चितच समन्वय राखला जाईल, असेही पंतप्रधानांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना सांगितले.

महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी शुक्रवारी पहिल्यांदाच आपला दिल्ली दौरा केला. सायंकाळी 5 वाजता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या 7 लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी भेट घेतली. महाराष्ट्राचे केंद्राकडे प्रलंबित असलेले प्रश्न आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर या उभय नेत्यांमध्ये सुमारे सवा तास चर्चा झाली. यावेळी पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरेसुद्धा उपस्थित होते.

केंद्र सरकार सोबत राहील

पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या 15 सफदरजंग येथील निवासस्थानी भरगच्च पत्रकार परिषद झाली. मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले, दिल्लीत यापूर्वी मी अनेकदा आलो आहे, पण मुख्यमंत्री या नात्याने पहिल्यांदाच आलो. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझे दूरध्वनीवर अभिनंदन केले होते, पण आज प्रत्यक्ष भेट झाली आणि चर्चाही झाली. खूप चांगल्या विषयांवर चर्चा झाली. राजकारण आपल्या ठिकाणी आहे. ते बाजूला ठेवूया, मात्र महाराष्ट्राला आवश्यक विषयांवर केंद्राचे निश्चित सहकार्य मिळेल. केंद्र सरकार महाराष्ट्रासोबतच राहील. दोन्ही सरकारमध्ये निश्चितच समन्वय राहील, असे आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. महाराष्ट्राला जे आवश्यक आहे त्यावर पंतप्रधानांशी चर्चा केली. त्याला समस्या म्हणण्याची गरज नाही, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले.

आडवाणी, शहा यांचीही भेट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची त्यांच्या पृथ्वीराज रोडवरील निवासस्थानी जाऊन भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी आडवाणी यांनी रामजन्मभूमीचे आंदोलन आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयींच्या आठवणींना उजाळा दिला. ‘उद्धवजी, माझ्या सदिच्छा कायमच तुमच्या पाठीशी आहेत’, असे सांगत आडवाणींनी उद्धव ठाकरेंचे अभिनंदन केले. यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत व शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही सदिच्छा भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्दय़ांवर चर्चा झाली. या बैठकीला पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांबाबत उभय नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. यावेळी राज्याचे राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरेसुद्धा उपस्थित होते.

‘सीएए’ला घाबरण्याचे कारण नाही

सीएए, एनआरसी आणि एनपीआरबाबत माझी आणि पक्षाची भूमिका सर्वांनाच माहीत आहे. ती मी अगोदरच स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे सीएएबाबत कोणीही घाबरण्याचे काहीही कारण नाही. एनआरसी संपूर्ण देशात लागू केली जाणार नाही हे संसदेतच सरकारने स्पष्ट केले आहे. राहिली बाब ती एनपीआरची. एनपीआर ही जनगणना आहे आणि ती दर दहा वर्षांनी होते. एनपीआरमुळे कोणाला देशाबाहेर काढले जाणार नाही. सीएए अमलात आले तरी नागरिकांनी घाबरून जायचे काहीएक कारण नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

जीएसटी परतावा जलदगतीने व्हावा

जीएसटीची परताव्यापोटी मिळणारी रक्कम अजूनही केंद्राकडे प्रलंबित आहे. ती मिळण्यासाठी केंद्र सरकारशी पत्रव्यवहारही केला आहे. केंद्राने त्यातील रक्कम पाठवलीही, पण उर्वरित रकमेचा परतावा जलदगतीने व्हावा अशी मागणी पंतप्रधानांकडे केली आहे. शिवाय पंतप्रधान पीक विमा योजनेलाही महाराष्ट्रात गती मिळायला हवी. महाराष्ट्रात कंपन्या येत नाहीत याकडे आपण पंतप्रधान मोदी यांचे लक्ष वेधल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकारने शेतकरी, बेरोजगार युवक आणि महिलांसाठी अनेक योजना आखल्या आहेत. मार्चपासून शेतकरी कर्जमुक्त होईल. त्यासाठीच केंद्राकडे असलेला महाराष्ट्राच्या निधीचा वाटा लवकरात लवकर मिळावा, अशी मागणीही मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे केली.

सोनिया गांधी यांचीही सदिच्छा भेट

img-20200221-wa0182

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची ‘10 जनपथ’ या निवासस्थानी भेट घेतली. राज्यातील राजकीय समीकरणे आणि इतर मुद्दय़ांवर यावेळी चर्चा झाली. महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाबद्दलही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली. यावेळी राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर तसेच काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे उपस्थित होते.

कोणतेही, कसलेही वाद नाहीत

राज्यपालांसोबत सरकारचे काही वाद आहेत का, असा प्रश्न पत्रकारांनी केला असता मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दांत इन्कार केला. केंद्र सरकार आणि राज्य सरकार तसेच राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये कसलेही वाद नाहीत. एवढेच कशाला, महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांमध्येही कोणतीच कुरबुर नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. आमचे सरकार पाच वर्षे स्थिर राहणार, असेही त्यांनी पत्रकारांना ठामपणे सांगितले. आम्ही गुण्यागोविंदाने कारभार करीत असून, वाद सोडा, साधा तणावही नसल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या