
राज्य विधिमंडळाचे नागपूर हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. याच पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री या नात्याने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे रविवारी प्रथमच नागपुरात आगमन झाले. विमानतळावर महाविकासआघाडी नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
सोमवारपासून नागपूर हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. हे अधिवेशन एक आठवडा चालणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा पहिला पेपर असणार आहे. याचा पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे रविवारी महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये आगमन झाले. यावेळी महाविकासआघाडीच्या नेत्यांनी व जनतेने त्यांचे प्रचंड उत्साहाने आणि जल्लोषाने स्वागत केले. यावेळी वरुणराजाने देखील हजेरी लावली.
नागपुरात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, याआधी मुंबईमध्ये दोन दिवसांचे अधिवेशन झाले, मात्र माझ्या वाटचालीची खरी सुरुवात महाराष्ट्राची उपराजधानी नागपुरातून होत आहे. उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे. भाजपपेक्षाही आम्ही चांगल्या पद्धतीने राज्य चालवून दाखवू आणि हे सरकार 5 नाही तर 25 वर्षे टिकेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.





























































