
राज्यात काही दिवसांसाठी पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही गाफील राहू नका. नागरिकांनाही गाफील राहू देऊ नका. लोकांना माहिती देत राहा. प्राणहानी होऊ नये यासाठी नागरिकांना विश्वासात घेऊन स्थलांतराचे काम करा, त्यांना तातडीने मदत करा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. अतिवृष्टी व पूरस्थितीत सतर्क राहून काम करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय यंत्रणेला यावेळी दिले.
पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे, कोकण, संभाजीनगर आणि नाशिक विभागीय आयुक्त तसेच या विभागातील जिल्हाधिकाऱयांशी व्हिडिओ काँन्फरन्सच्याद्वारे संवाद साधला.
पुराच्या पाण्यामुळे निर्माण होणारे संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना वेगाने हाती घ्याव्यात असेही मुख्यमंत्री म्हणाले.
पूर आणि अतिवृष्टीने शेतपिके आणि मालमत्तेचे जे नुकसान झाले त्याचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याची कार्यवाही तत्काळ सुरु करावी. दुर्देवाने यात जे नागरिक मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबिंयाना तातडीने आर्थिक मदत देण्याची व्यवस्था करावी, अशा सुचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
शेती, पिकांच्या नुकसानीबरोबरच पशुधन, घरे, रस्ते, पाणीपुरवठा योजना, वीज पुरवठय़ाशी संबंधित बाबी, शाळा, ग्रामपंचायत इमारती, प्राथमिक आरोग्य केंद्र याच्या नुकसानीची माहिती घेऊन पंचनामे तातडीने करण्याच्या सुचनाही बैठकीत देण्यात आल्या.
या बैठकीला खासदार अनिल देसाई, खासदार विनायक राऊत, मुख्यसचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, मदत पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर उपस्थित होते.
आवश्यक मदत पुरवा
पूरग्रस्त भागात मदत पथकाकडून अनेक ठिकाणी नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. हे करतांना कोरोनासंदर्भातील उपाययोजनांची काळजी घेण्यात यावी, मास्क, सॅनिटायझर यासारखी सुरक्षा साधने पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत. अजूनही काही दिवसांसाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर आवश्यकतेनुसार भविष्यात करावयाचे स्थलांतर याचेही वेळीच नियोजन करावे, स्थलांतरीत कुटुंबांची काळजी घेण्यात यावी. पूर ओसरल्यानंतर ते पुन्हा त्यांच्या घरी गेल्यास त्यांना तिथे आवश्यक असणारी मदत पुरवण्यात यावी असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
सर्वतोपरी सहकार्य करू!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. याबाबत त्यांनी मराठीतून ट्विट केले असून ते म्हणतात, महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि पूरस्थितीबाबत मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो. आपत्तीग्रस्त बंधू-भगिनींबरोबर माझ्या सहवेदना आहेत. बचाव आणि मदत कार्यामध्ये केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन मी पुन्हा एकदा दिले.





























































