
ओबीसी समाजाच्या मागण्यांची आणि प्रश्नांची आपल्याला जाणीव असून त्याची पुर्तता करण्यासाठी तसेच त्याचा पाठपुरावा करून ते प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापन केली जाईल. ओबीसी समाजाच्या मागण्यांचा साकल्याने विचार करून मागण्यांबाबत तातडीने निर्णय घेण्यासाठी ही समिती असेल. कोणत्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ओबीसी नेत्यांना दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ओबीसी समाजाच्या प्रतिनिधींसोबत आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, ओबीसी समाजाच्या मागण्यांची आणि प्रश्नांची आपल्याला जाणीव असून त्याची पूर्तता करण्यासाठी तसेच त्याचा पाठपुरावा करून ते प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापन केली जाईल. या समितीने ओबीसी समाजाच्या मागण्यांचा साकल्याने विचार करावा व जे निर्णय तत्काळ घेता येतील त्याची प्रक्रिया गतिमान करावी. याच पद्धतीने समाजाच्या कामांसाठी आवश्यक निधीसाठीही मागणी करताना प्राधान्याने हाती घ्यावयाची कामे निश्चित करावीत, असे निर्देशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.
टप्प्याटप्प्याने प्रश्न मार्गी लावू
मुख्यमंत्री म्हणाले की, टप्प्या टप्प्याने ओबीसी समाजाचे प्रश्न आपण नक्की मार्गी लावू. कोरोनामुळे लॉकडाऊन लागले आणि त्यामुळे कामांची गती मंदावून आरोग्य या विषयाची प्राथमिकता वाढली. आता आपण अनलॉक प्रक्रियेमध्ये जीवनाला पुन्हा गती देत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. बैठकीस अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री अनिल परब, जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह मुख्य सचिव सीताराम पुंटे, माजी आमदार प्रकाश शेंडगे आणि ओबीसी समाजाचे, बारा बलुतेदार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.



























































