नैसर्गिक आपत्तीची माहिती नागरिकांना वेळेत मिळायला हवी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तींचा अंदाज घेऊन सर्व यंत्रणांनी समन्वयाने व काळजीपूर्वक काम करावे. या आपत्तीची माहिती नागरिकांना वेळीच मिळायला हवी. हवामान विभागानेही प्रशासनाला पाऊस, वादळ व इतर आपत्तीविषयी माहिती मिळत राहील यासाठी सतर्क राहावे, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

कोकण विभागातील सर्व जिह्यांचा पावसाळ्यापूर्वीच्या तयारीचा आढावा दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते. मुख्य सचिव सीताराम पुंटे यांनी बैठकीचे संचालन केले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, हवामान विभागाकडून आपत्तीविषयी वेळेत माहिती मिळाल्यास यंत्रणांना सावध राहून बचावकार्य करता येईल. मासेमारी बोटींशी या काळात संपर्क साधून त्यांनाही सूचना देता येईल. या माहितीबरोबरच प्रशासनाने वीज प्रतिरोधक यंत्रणा, जिह्याचे नियंत्रण कक्षदेखील व्यवस्थित कार्यान्वित असावेत याची काळजी घ्यावी.

यावेळी कोकणातील जिह्यांचे जिल्हाधिकारी, तटरक्षक दल, मत्स्यव्यवसाय विकास, हवामान विभाग, नौदल यांनी बैठकीत आपापल्या तयारीची माहिती दिली तसेच सूचना केल्या. मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशीष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱहाड, प्रधान सचिव मदत व पुनर्वसन असीम गुप्ता, अनुप कुमार, पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आदींची उपस्थिती होती.

तिवरेसारखी दुर्घटना घडू नये म्हणून सावध राहा

गेल्या वेळेस तिवरे धरणाची दुर्घटना घडली होती. यंदा संबंधित सर्व यंत्रणांनीदेखील मातीच्या धरणांची देखभाल व दुरुस्ती व्यवस्थित झाल्याची खात्री करून घ्यावी तसेच आजूबाजूच्या गावांतील लोकांनादेखील सावध करावे आणि आणि त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था करून ठेवावी. गेल्या वर्षीदेखील पावसाळ्याच्या काळात पालघरमध्ये लहान लहान भूकंपांची मालिका सुरू झाली होती हे पाहता तेथील यंत्रणेनेदेखील सावध राहावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या.

प्रत्येक जिह्यात आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यान्वित

कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सादरीकरण केले. गेल्या वर्षी विभागात 3173 मिमी पाऊस झाला होता असे त्यांनी सांगितले. विभागात 371 पूर प्रवण आणि 223 दरडग्रस्त गावे आहेत. प्रत्येक जिह्यात आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू झाले असून ते 24 तास सुरू राहणार आहेत. याशिवाय जीवरक्षक बोटी, जॅकेट व इतर सामुग्री उपलब्ध आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल तुकडी चिपळूण येथे तैनात ठेवण्यासाठी विनंती केली आहे, मॉक ड्रील झाले असून ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या वेळेची नुकसानभरपाई 100 टक्के दिली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

चार ठिकाणी लवकरच नवीन रडार

हवामान विभागाचे उपसंचालक के. एस. होसाळीकर यांनी माहिती देताना सांगितले की, महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल असा अंदाज आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई या चार ठिकाणी लवकरच नवीन रडार उभारण्यात येत असून त्यामुळे हवामानाचा अंदाज अधिक परिपूर्ण व अचूक येऊ शकेल अशी माहिती त्यांनी दिली. पूर्वी आपल्याकडे चक्रीवादळाचा धोका नसायचा, पण 2017 पासून ‘ओखी’, ‘वायू’, ‘क्यार’, ‘निसर्ग’ यांसारख्या चक्रीवादळांनी किनारपट्टीतील भागाचे खूप नुकसान केले. वीज पडण्याचा धोका हा प्रत्यक्ष पावसाळ्यापेक्षा अगोदरच्या काळात म्हणजे एप्रिल-मेमध्ये जास्त असतो असे सांगून होसाळीकर यांनी नवीन तंत्रज्ञान विकसित झाल्याने हवामानाचा अचूक अंदाज करणे शक्य झाल्याची माहिती दिली.