छत्रपतींच्या स्मारकामध्ये घोटाळा होणे निंदनीय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

1727

आमचे सरकार शेतकऱ्यांच्या आणि जनतेच्या हिताचा निर्णय घेणार आहे. आम्ही जनतेला दिलेले सर्व वचने पूर्ण करणार आहोत. आम्ही दिलेली वचने पाळणारे आहोत, आम्ही कधीही वचने तोडत नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ते पत्रकारांशी संवाद साधत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या कामात घोटाळा होणे निंदनीय असल्याचे सांगत, घोटाळा झाला असेल तर दोषींवर 100 टक्के कारवाई करणार, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

आपली कारकिर्द राज्याची उपराजधानी नागपूरमधून सुरू होत असल्याचा आनंद असल्याचे ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या कामात गोंधळ, घोटाळे झाल्याचे उघड होत आहे, हे निंदनीय असल्याचे ते म्हणाले. याचा तपास करून या कामात खरोखर घोटाळा झाला असेल तर दोषींवर 100 टक्के कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. स्मारकाच्या कामाला स्थगिती दिलेली नाही. त्यातील गोंधळ दूर होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. आम्ही वेगळ्या विचारधारेचे पक्ष सरकारमध्ये एकत्र आलो आहोत. आमची विचारधारा वेगळी आहे. आमच्यात मतभेद होते. आजही काही मुद्द्यांवर आमचे विचार वेगळे आहेत. मात्र, जनतेच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. त्यासाठी आम्ही किमान समान कार्यक्रम बनवला आहे आणि त्यानुसारच जनतेच्या हिताचे काम करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबतची आमची भूमिका स्पष्ट केली आहे. या मुद्द्यावरून आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या आधीच्या मित्र पक्षाने देशात सध्या काय परिस्थिती निर्माण केली आहे, असा सवाल त्यांनी केला. सावरकरांबाबत आमच्या मागणीची वाट का बघता, नागरी सुधारणा कायदा केला, मग सावरकरांबाबतचा निर्णय का घेतला नाही, असा सवाल त्यांनी केला. या मुद्द्यावर शिवसेना आग्रही आणि आक्रमक आहे. तवेढी त्यांची आग्रही मागणी कधीही दिसली नाही. सिंधू नदीपासून ते बंगालच्या उपसागरापर्यंत देश एकसंघ असावा असे सावरकरांचे विचार होते. आज देशात तुमची सत्ता आहे, तुमच्याकडे बहुमत आहे. तुम्ही देश एकसंघ करणार आहात का, असा सवाल त्यांनी केला. देश एकसंघ करण्याऐवजी शेजारील देशांतील अल्पसंख्याकांना येथे बालावून तुम्ही त्यांना असुरक्षित करत आहात. हा कायदा करून तुम्ही सावरकरांचे विचार मानत नाही, हे दाखवून दिले आहे. हा कायदा करण्याऐवजी शेजारी देशांना अल्पसंख्याकांवर अन्याय झाल्यास खपवून घेणार नाही, असे ठणकावून सांगायला हवे होते. या कायद्यामुळे देशात उसळलेल्या हिंसाचाराचे काय, असा सवाल त्यांनी केला. या कायद्याबाबत आम्ही विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे मिळालेली नाहीत. अजूनही कायद्यात स्पष्टता नाही. हा कायदा घटनेला धरून आहे काय, यावर न्यायालयात निर्णय होणे अपेक्षित आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढील दिशा ठरवण्यात येईल, असे ते म्हणाले.

हे अधिवेशन सहा दिवसांचे अधिवशेन असले तरी आमचा कार्यकाळ पाच वर्षांचा आहे. आमचे मंत्रिमंडळ जनतेला बांधील आहे. आम्ही दिलेली वचने पाळणारी माणसे आहेत. आम्ही वचने तोडत नाही. जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्यात येणार आहेत. आम्ही कोणत्याही विकासकामांना स्थगिती दिलेली नाही. फक्त आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आहे. कारशेडसाठी मोठ्या प्रमाणात निर्घृणपणे झाडांची कत्तल करण्यात आली. त्यामुळे आरेतील जैवविविधता धोक्यात येण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेतला. सध्या देशापुढे गंभीर प्रश्न असताना नको त्या गोष्टी पुढे करत जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होत आहे. महिलांची सुरक्षितता, बेरोजगारी, देशातील हिंसाचार याकडे केंद्र सरकारने लक्ष द्यावे. जनतेचे लक्ष या मूळ समस्यांकडे वळवण्याचा आपला प्रयत्न आहे. समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तिजोरीची चावी आताच आमच्याकडे आली आहे. आर्थिक स्थितीची माहिती घेऊन जनतेसमोर सत्यचित्र मांडणार असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या