
‘तौकते’ चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी, मुंबई, पालघरमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. वादळाचा धोका कमी झाला असला तरी मदतकार्य वेगाने सुरू ठेवा. परिस्थिती पूर्वपदावर आणा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी तसेच सर्व यंत्रणांना दिले.
चक्रीवादळाचे संकट राज्यावर घोंघावत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सतत यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेतलाच, शिवाय यंत्रणांना योग्य निर्देशही दिले. फोन, दूरदृश्य प्रणाली अशा विविध माध्यमांतून त्यांनी दिवसभर स्थानिक यंत्रणांशी संपर्क सुरूच ठेवला.
कोकण विभागीय आयुक्त तसेच जिह्यांच्या जिल्हाधिकाऱयांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने माहिती घेत होते. चक्रीवादळाचा प्रवास गुजरातकडे होत असला तरी कोकणातील मुसळधार पाऊस व जोरदार वारे पाहता सावधगिरी बाळगण्याच्या आणि यंत्रणा सज्जच ठेवा. रस्त्यावरील पडलेली झाडे, पडलेले विजेचे खांब तातडीने काढून तसेच अगदी गावांपर्यंत जाणारे अंतर्गत रस्तेही मोकळे करून वाहतूक सुरू राहील याची काळजी घ्या, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मच्छीमारांच्या काही बोटींचे नुकसान झाल्याबाबतही त्यांनी माहिती घेतली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी सबंधित जिह्यांच्या पालकमंत्र्यांशी चर्चा करून त्यांनाही परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सांगितले.
2 हजार 542 बांधकामांची पडझड
चक्रीवादळामुळे 2 हजार 542 घरांची अंशतः तर 6 घरांची पूर्ण पडझड झाली आहे. यात ठाणे जिह्यात 24, पालघर 4, रायगड 1784, रत्नागिरी 61, सिंधुदुर्ग 536, पुणे 101, कोल्हापूर 27, सातारा 6 अशा पडझड झालेल्या बांधकामांचा तपशील आहे.
कोविड रुग्णालयांना अखंड वीज पुरवठा
किनाऱयावरील जिह्यांमध्ये काही नुकसान व पडझड झाली असली तरी कोविड रुग्णालयांना वीज पुरवठा खंडित होऊ देण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे पुरवठय़ाची पर्यायी व्यवस्था सक्षमपणे सुरू आहे याविषयीही मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली.
12 हजार 500 जणांना सुरक्षित स्थळी हलवले; 6 मृत्यू, 9 जखमी
वादळामुळे एकूण 6 मृत्यू झाले असून 9 जण जखमी झाले आहेत. एकूण 12 हजार 500 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. ठाणे 2, रायगड 3, सिंधुदुर्ग 1 असे 6 जण मरण पावले आहेत. मुंबईत 4 , रायगड आणि रत्नागिरीत प्रत्येकी 2 आणि ठाण्यात 1 व्यक्ती जखमी आहे. रायगड आणि रत्नागिरी येथे प्रत्येकी 2 अशी 4 जनावरे मरण पावली आहेत.





























































