
आपला हा महाराष्ट्र साधुसंतांचा, छत्रपती शिवरायांचा आहे. मात्र सध्या सुरू आहे ते विकृत, सडलेले, नासके राजकारण. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. तुम्ही कुठे नेताय आपला महाराष्ट्र, असा रोखठोक सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भाजपला केला.
‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वेब मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी भोंगेधारी-पुंगीधारी यांचा तर खरपूस समाचार घेतलाच, पण राज्यातील सध्याच्या घडामोडींवर त्यांनी सडेतोड भूमिका मांडली. राज्य सरकार भाजपमागे फरफटत चालले आहे का, या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही कुठेही फरफटत गेलेलो नाही. उलट भाजपला समजत नाही की आता करायचे काय? कारण अडीच वर्षे झाली तरी सरकारला काहीच होत नाही. ईडी वगैरे सगळे झाले. आता तर लोकांच्या मनात तीव्र संताप उफाळून यायला लागला आहे. जी तुमची थेरं चालली आहेत की यावर धाड त्यावर धाड. असे राजकारण आपल्या लोकांनी कधीच बघितलेले नाही. या पातळीवर राजकारण कधीच गेले नव्हते, असे मुख्यमंत्र्यांनी भाजपला सुनावले.
उत्तर प्रदेशात भोंगे काढले, मग महाराष्ट्रात का नाही, या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, उत्तर प्रदेशात कोरोना काळात गंगेत मृतदेह फेकून दिले होते. 70 पेक्षा जास्त मुलांचा ऑक्सिजनअभावी तडफडून मृत्यू झाला. सगळी मैदाने स्मशानभूमी बनली होती. त्यामुळे तो मुद्दा जास्त भयानक आणि भीषण वास्तव सांगणारा आहे. मला माझ्या महाराष्ट्रातील जनतेच्या जिवाची पर्वा आहे. तेथे भोंगे काढले, पण जे परवानगी मागतील आणि ज्यांना ते परवानगी देतील तेथे परत भोंगे चढणार आहेत. यातील खरा मुद्दा अजान नसून आवाज आहे हे ज्यांना कळत नाही ते ‘अजाण’तेपणाने बोलतात, असे मला वाटते, असेदेखील मुख्यमंत्री म्हणाले.
n कागदपत्रांवर स्टॉप पडला म्हणून कांजूरची जागा तुमची झाली का? ती जागा महाराष्ट्राची आहे. मेट्रो कारशेडसाठी ती जागा नाही दिली केंद्राने तर?… तर आम्ही मार्ग काढत आहोत.
n नाणार येथील रिफायनरी प्रकल्पासाठी पर्यायी जागा शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
n सरकारची सूत्रे कोणाच्या हातात या चर्चेत दम नाही. एकत्र हेच आमच्या सरकारचे सूत्र आहे.
n पूर्वी सत्ताधारी-विरोधक औपचारिक, अनौपचारिकपणे भेटायचे. आता मात्र फक्त बुद्धिबळ खेळला जातो. बाकी काही नाही.
– ही शिवसेना बाळासाहेबांची नाही, असा आरोप होतो. हो बरोबर आहे. बाळासाहेब ठाकरे भोळे होते. मी भोळा नाही. त्यांनीच माझ्या रक्तात हिंदुत्व भिनवलं आहे. पण हिंदुत्वाच्या आडून भाजप जे डाव साधत होता त्याकडे बाळासाहेब कानाडोळा करत होते. मी तसे करणार नाही. मी धूर्त आहे. फसणार नाही.
– आमचे सरकार योग्य की अयोग्य हे जनता ठरवेल. ती वेळ येत नाही तोपर्यंत तुम्ही हे सरकार पाडण्याचा आणि छळण्याचा आटापिटा करू नका. तसे झाले तर नाइलाजाने तुमच्या शासनामुळे पीडित झालेली सर्व राज्ये एकत्र आल्याशिवाय राहणार नाहीत.
फुकटात करमणूक का नको?
नवहिंदुत्ववाद्यांनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगलेच शालजोडीतले हाणले. ते म्हणाले, ‘हिंदुत्वाच्या नव्या खेळाडूंकडे मी लक्ष देत नाही. हे खेळाडू कोणत्या मैदानात कोणते कोणते खेळ करतात हे आतापर्यंत लोकांनी अनुभवले आहे. याला माकडचाळे म्हणतात. कधी मराठीचा तर कधी हिंदुत्वाचा खेळ करायचा, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, दोन वर्षांत कोविड काळात सर्व बंद होते. नाटक, सिनेमा, थिएटर सगळे बंद होते. त्यामुळे आता फुकटात करमणूक करून मिळत असेल तर का नको?
भोंगाबंदी देशभर करा
जसे नोटाबंदी, लॉकडाऊन देशभर केले तसे भोंगाबंदी देशभर करा, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने भोंग्याबाबत जो निकाल दिला आहे त्यात केंद्र सरकारसुद्धा एक पार्टी होती. पेंद्राने तो आदेश काढला पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
धक्के बसत राहतील
आम्ही तिघे एकत्र आलो याचे आधी लोकांना आश्चर्य वाटले. आता या तीन पक्षांच्या सरकारने अर्धा कालखंड पूर्ण केला याचे विरोधकांना आश्चर्य वाटते आहे. या पाच वर्षांतच नव्हे तर पुढील निवडणुकीनंतरही विरोधकांना हे धक्के बसत राहतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
‘त्यांना’ हाताळणारे लाखो हात आहेत
भ्रष्टाचाराचे आरोप करणारे असो की हनुमान चालिसा पठणाचा राजकीय हट्ट करणारे असो, त्यांना हाताळण्यात शिवसेना, सरकार कमी पडते आहे का? या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, त्यांना हाताळणारे लाखो-करोडो हात आहेत. त्यांच्यापासून त्यांना वाचवण्यात मी कमी पडतो की काय, अशी मला भीती वाटते. त्यामुळे हाताळण्याची मला काही चिंता नाही, उलट वाचवण्याची चिंता पडते.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात उभारण्यात आलेल्या शिवनेरी किल्ल्याच्या भव्य प्रतिकृतीचे उद्घाटन रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी सौ. रश्मी ठाकरे, परिवहनमंत्री अॅड. अनिल परब, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, सचिन अहिर आदी उपस्थित होते. या प्रतिकृतीमागे मुंबाआईची प्रतिकृती आहे. भारतीय कामगार सेनेच्या वतीने ही प्रतिकृती उभारण्यात आली असून कला दिग्दर्शक अमन विधाते यांनी ती बनवली आहे.


































































