विरोधकांच्या पोटदुखीवर मोफत उपचार करू! भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱयांना मुख्यमंत्र्यांचे इंजेक्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोविड काळात संपूर्ण देशातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्राने अतिशय उत्तमपणे परिस्थिती हाताळली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयानेही राज्याचे कौतुक केले, पण काही जणांना आपले कौतुक आवडले नाही. त्यामुळे त्यांना पोटदुखी व मळमळ सुरू झाली, पण अशा विरोधकांवर आरोग्य केंद्रात मोफत उपचार करण्याची तयारी आहे, असा सणसणीत टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मारला.

जालना येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे नूतनीकरण झाले आहे. या नव्या वास्तूचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हीसीच्या माध्यमातून उद्घाटन केले. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी कोविड काळात धर्मादाय संस्था, राज्य सरकारने केलेल्या कामांचा आढावा घेताना भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱयांचा समाचार केला.

यावेळी व्हीसीच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे,  मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रकांत भडंग, विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे, धर्मादाय आयुक्त प्रमोद तरारे,  धर्मादाय वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. प्रदीप कुलकर्णी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशीषकुमार सिंह यांच्यासह विधी व न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कोविड काळात भ्रष्टाचार केला आणि तो खणून काढणार म्हणून विरोधक सांगत आहेत. काय भ्रष्टाचार बाहेर काढायचा तो काढा. भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱयांपेक्षा आपण ज्यांचे प्राण वाचवले त्यांची संख्या खूप मोठी आहे.
-उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

कौतुक केल्याने धडधड वाढते

या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामाचे इतर वक्त्यांनी कौतुक केले. त्याचा उल्लेख करताना मुख्यमंत्र्यांनी सलमान खान व सोनाक्षी सिन्हाच्या ‘दबंग’ चित्रपटातील संवादाचा दाखला दिला. ‘थप्पड से डर नही लगता, प्यार से डर लगता है…’ आम्ही राजकारणातील लोक आहोत. नेहमी थपडा देणे व थपडा खाणे हे आमचे आयुष्य. त्यामुळे कौतुक केले की धडधड वाढते. पण ‘ते कौतुक’ करणारे वेगळे व माझ्या घरच्यांनी कौतुक करणे वेगळे. मी कुटुंब प्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्य माझे कुटुंब आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

प्राण वाचवलेल्यांची संख्या अधिक

कोविड काळात चांगल्या पद्धतीने ही परिस्थिती आपण हाताळू शकलो. अनेक ठिकाणी कोविड केंद्र, चाचणी केंद्रे उभारली. हा सरकारचा भाग होताच, पण धर्मादाय संस्थाचाही भाग होता. पण काही जणांना आपले कौतुक परवडत नाही. मग त्यांच्या पोटात मळमळ होते. त्यातूनच भ्रष्टाचार बाहेर काढणार असे सांगू लागले. काढा भ्रष्टाचार काढा, काय काढायचे ते काढा. पण आपण सेवा दिल्यामुळे लोकांचे प्राण वाचवू शकलो, असे मुख्यमंत्री म्हणाले.

विरोधकांवर उपचार आपले कर्तव्य

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे कौतुक करताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोविड काळात आरोग्यमंत्री पाय रोवून उभे राहिले. कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन आले. म्हणूनच आरोप करणाऱया लोकांना किंमत देण्याची गरज नाही. त्यांची पोटदुखी आहे, त्यांची मळमळ आहे तेही आरोग्य केंद्रात मोफत तपासणी करून घेऊ शकतात, इलाज करणे आपले कर्तव्य आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.