
तौकते चक्रीवादळामुळे कोकणात घरे, झाडे तसेच अन्य मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. वादळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या या भागाला जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी सर्वपक्षीय नेते मागणी करीत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः शुक्रवारी कोकण दौरा करणार असून येथील नुकसानीचा आढावा घेणार आहेत. दोन दिवसांचा हा दौरा असेल, अशी माहिती सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत हे कोकणच्या दौऱयावर आहेत. कोकणातील नुकसानीची पाहणी केल्यानंतर उदय सामंत यांनी येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही कोकणात येऊन नुकसानीची पाहणी करणार असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार कोकण दौरा
मुख्यमंत्री उद्वव ठाकरे शुक्रवारी कोकणातील नुकसानीची पाहणी करतानाच ग्रामस्थांशीही संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते एक आढावा बैठक घेऊन अधिकाऱयांकडून नुकसानीची माहिती घेणार आहेत, असे सामंत यांनी सांगितले.
नाना पटोले, वडेट्टीवार, अस्लम शेख यांचाही दौरा
मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे सुद्धा उद्या 20 मे रोजी कोकण दौऱयावर जाऊन नुकसानीची पाहणी करणार आहेत. 20 ते 23 मेपर्यंत तीन दिवसांचा त्यांचा कौकण दौरा राहणार आहे. त्यांच्याप्रमाणेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेही कोकण दौऱयावर जाणार आहेत. मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री अस्लम शेख उद्या पालघर दौरा करणार आहेत.
भरघोस मदत द्या; फडणवीस यांची मागणी
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तीन दिवसांच्या कोकण दौऱयावर आहेत. आज रायगड दौऱयादरम्यान तौकते चक्रीवादळात नुकसान झालेल्या जिल्ह्यांना भरघोस मदत जाहीर करावी, अशी त्यांनी राज्य सरकारकडे मागणी केली. या वादळाचा सर्वाधिक तडाखा रायगडला बसला असून लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून स्थानिकांना दिलासा द्या, असेही त्यांनी सांगितले. अलिबाग शहरातील मच्छीमार बांधवांच्या झालेल्या बोटींच्या नुकसानीबाबत जेट्टीवर जाऊन फडणवीस यांनी पाहणी केली. उद्या रत्नागिरी, तर परवा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ते दौरा करणार आहेत. त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हेही आहेत. त्याचप्रमाणे आशीष शेलार हेही उद्या पालघर दौरा करणार असून त्यात ते सरावली, सातपाटी, अर्नाळा गावांना भेट देणार आहेत.


































































