मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर, पूरग्रस्त भागांची पाहणी करणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 26 जुलै रोजी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पूर परिस्थितीची  पाहणी करतील. तसेच महापुराने बाधित झालेल्या लोकांच्या निवारा छावणीस भेट देऊन संवाद साधतील.

सातारा जिल्ह्यात सध्या चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यात भूस्खलन झाले असून मौजे आंबेघर आणि मौजे मिरगाव येथे दरड कोसळून दुर्घटना झाल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सकाळी 10.45 वाजता पुण्याहून कोयनानगरकडे हेलिकॉप्टरने रवाना होतील.

दुर्घटनाग्रस्त भागांची हवाई पाहणी करून मुख्यमंत्र्यांचे 11.30 वाजता कोयनानगर हेलिपॅडवर आगमन होईल. नंतर 11.40 वाजता ते कोयनानगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील निवारा छावणीस भेट देतील व पूरग्रस्तांची विचारपूस करतील.

दुपारी 12.15 वाजता कोयनानगर येथे जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदही आयोजित करण्यात आली आहे. दुपारी 1.25 वाजता मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने पुणे विमानतळाकडे रवाना होतील.

आपली प्रतिक्रिया द्या