नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या याचिकेवरील सुनावणीत शरद बोबडे रामशास्त्री बाण्याने न्याय देतील- मुख्यमंत्री

3283

सध्या देशात अस्थिरतेचे वातावरण आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा केला आहे. हा कायदा घटनेला धरून आहे अथवा घटनाबाह्य आहे यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल. त्या न्यायप्रक्रियेत सरन्यायाधीश शरद बोबडे रामशास्त्री बाण्याने न्याय देतील असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी विधानसभेत व्यक्त केला.

सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल शरद बोबडे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी विधानसभेत मांडला त्यावेळी ते बोलत होते. मूळचे नागपूरचे असलेले शरद बोबडे यांचे अभिनंदन नागपूरच्या अधिवेशनात करता आले हा दुर्मिळ योगायोग आहे. महाराष्ट्राचे सुपुत्र शरद बोबडे यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी निवड झाल्यामुळे अभिमानाने ऊर भरून आले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे न्यायवस्थेला नवचैतन्य मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्रात सध्या शेतकऱयांचा प्रश्न गाजत आहे असे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, शेतकऱयांना न्याय मिळवून देण्यात शरद बोबडे आग्रही होते. दरम्यान, सध्या शरद ऋतू सुरू असल्याचा उल्लेख करीत हा ऋतू म्हणजे नवचैतन्याचा असून सरन्यायाधीश बोबडेंच्या रूपाने नवचैतन्य येईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

विधान परिषदेतही अभिनंदन

शरद बोबडे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव विधान परिषदेचे सभागृह नेते सुभाष देसाई यांनी मांडला. विधान परिषदेच्या उपसभापती डाँ. नीलम गोऱहे यांनी अभिनंदन प्रस्तावाला अनुमोदन दिले.शरद बोबडे यांचा सत्कार मुंबई येथील 2020अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्याचा निर्णय विधान परिषद सभापती व विधिमंडळाने घ्यावा असे डाँ. गोऱहे म्हणाल्या. यावेळी मंत्री नितीन राऊत,विधान परिषद सदस्य अनिल सोले, गिरीश व्यास, शरद रणपिसे, हेमंत टकले, कपिल पाटील यांनी शरद बोबडे यांचे अभिनंदन केले. सभापती रामराजे निंबाळकर यांनी शरद बोबडे यांच्या अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर झाल्याचे जाहीर केले.

कष्टमय-संघर्षमय जीवन

बोबडे यांचे संपूर्ण जीवन कष्टमय व संघर्षमय आहे. बोबडे यांचे आजोबा वकील होते, त्यांचे वडीलही निष्णात वकील होते. नागपूरच्या सिव्हिल लाईन भागातील बोबडे यांचे निवासस्थान म्हणजे कायद्याचे प्रसन्न झाड आहे. ज्यांना कायद्याचा अभ्यास करायचा असेल ते आजही त्या ठिकाणी जातात आणि त्याच आवारातून अनेक निष्णात वकील घडले आणि भविष्यातही घडतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.  दरम्यान शरद बोबडे यांनी खटला लढण्यासाठी शेतकऱयांकडून कधीही फी घेतली नाही. शेतकऱयांच्या कर्जमुक्तीची पहिली कायदेशीर सुरुवात त्यांनी केली, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

शरद बोबडे हे अतिशय साधे व शेतकऱयांची आस्था असलेले व्यक्तिमत्त्व आहे. महाराष्ट्राच्या या सुपुत्राचे मन:पूर्वक अभिनंदन अशा शब्दात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

शिवस्मारकातील भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचे काँग्रेसकडून स्वागत 

शिवस्मारकात भ्रष्टाचार असेल तर कारवाई करणार अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. काँग्रेसने मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे. यामधील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत याबाबतची भूमिका मांडली होती. छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाविषयी कॅगने ठेवलेल्या ठपक्याबाबत मुख्यमंत्र्यांनी रोखठोक भूमिका मांडली होती. सरकार म्हणून आम्ही त्याची माहिती घेणार आणि यात जो कोणी गुन्हेगार किंवा दोषी असेल आणि जर भ्रष्टाचार झाला असेल तर कारवाई करणार असे पत्रकार परिषदेत सांगितले होते. काँग्रेसने मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे.  कॅगने एप्रिल ते मे 2019 या काळात शिवस्मारकाच्या कामाचे ऑडिट केले. त्याचा अहवाल ऑक्टोबरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठवला होता याकडे काँग्रेसने लक्ष वेधले.  शिवस्मारकाच्या प्रकल्प सल्लागाराला अनावश्यक 9 कोटी 61 लाख  रुपयांचा फायदा करून दिल्याचा ठपका कॅगने ठेवला आहे. त्यामुळे दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे.

दोषींवर कारवाई केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

राज्यात शिवस्मारकाच्या कामात भ्रष्टाचार झाला असल्याचा पर्दाफाश आम्ही केला आहे. त्यामुळे लक्षवेधीच्या माध्यमातून हा मुद्दा सभागृहात मांडून हा भ्रष्टाचार लोकांसमोर आणल्याशिवाय आणि संबंधितांवर कारवाई केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवत्ते आमदार नबाब मलिक यांनी सोमवारी विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना दिली.

माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे इशारा करीत त्यांनी भ्रष्टाचार केला असल्याचे आम्ही सिद्ध करूनच दाखवू असे नबाब मलिक यांनी आज सांगत विरोधकांना आव्हान दिले आहे. सरकारने या प्रकरणी चौकशी समिती स्थापन करावी आणि भ्रष्टाचार पुढे आणावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

मुंबईच्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व्हावे यासाठी आघाडी सरकारने जागा निश्चित केली होती. भाजपचे सरकार आल्यावर त्या जागेवर पंतप्रधानांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. नंतर निविदा काढण्यात आली. यावेळी काम कोणाला द्यावे हे निश्चित न झाल्यामुळे फेरनिविदा काढून हे काम दिले गेले. या प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे वरिष्ठ अधिकाऱयांनी कॅगला कळवले होते. त्यानंतर कॅगनेही यासंदर्भात अहवाल दिला असल्याचे नबाब मलिक यांनी स्पष्ट केले.आम्ही म्हणजे मी आणि काँग्रेसचे सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन हा भ्रष्टाचार उघड केला होता याकडे मलिक यांनी लक्ष वेधले. आज आम्ही काम थांबवले म्हणून ओरड सुरू असल्याचे सांगत या भ्रष्टाचाराची चौकशी व्हायला नको का असा सवालही मलिक यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या