महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणात दोषींवर तातडीने कारवाई करा! मुख्यमंत्र्यांचे आदेश

885

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला प्रतिबंध घालण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पोलीस महासंचालक कार्यालयात बैठक घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जायस्वाल, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेतला. महिला अत्याचारांविषयी कारवाई करण्याबाबत निर्देश देताना उद्धव ठाकरे म्हणाले, महिलांवरील अत्याचाराबाबत कठोरात कठोर पावले उचलण्यात यावीत. महाराष्ट्र पोलीस दलाच्या कामाची वाखाणणी नुकत्याच पार पडलेल्या देशातील पोलीस महासंचालकांच्या परिषदेत झाली. महिला अत्याचाराच्या प्रकरणात तत्काळ व जलद कार्यवाही करून गुन्हेगारांना वचक बसेल असे काम करावे. या बैठकीत व्हिडीओ कॉन्फरन्सवर पुणे, ठाणे, संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई पोलीस आयुक्तांशी तसेच परिक्षेत्रांच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांशी संवाद साधून त्यांनाही मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केले.

‘निर्भया’ फंडामधील निधी खर्च न झाल्याची बाब गंभीर आहे. या निधीचा तत्काळ विनियोग करण्यासाठी कार्यपद्धती तयार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. महिलांवरील अत्याचाराबाबत कुणाचीही गय करू नका. कठोरात कठोर पावले उचलून दोषींवर तत्काळ कारवाई करा. गुन्हेगारांना वचक बसेल असे काम करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पोलिसांना दिले.

आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी पावले टाका      

सर्वसामान्य नागरिकाला पोलिसांविषयी आदर आणि त्याचबरोबर दरारा वाटेल अशा पद्धतीने काम करावे. काही वेळा न्याय्य मागण्यांसाठी सर्वसामान्य नागरिक अहिंसात्मक मार्गाने रस्त्यावर उतरतात. अशा वेळी नोंदविण्यात आलेले गंभीर गुन्हे वगळता साध्या स्वरूपाचे गुन्हे काढून घेण्यासाठी सकारात्मक पावले टाकावीत. अतिशय आवश्यक असेल तेव्हाच बळाचा वापर केला पाहिजे, अशा सूचनाही उद्धव ठाकरे यांनी केल्या.

खाकी वर्दीतला माणूस मजबूत करायचाय

पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी ज्या ज्या आवश्यक असतील त्या सर्व सुविधा शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येतील. आपल्या सरकारला खाकी वर्दीच्या आतला माणूस मजबूत करायचा आहे, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी यावेळी पोलीस दलाला दिला. पोलिसांमुळे नागरिकांचे सण-उत्सव आनंदात पार पडतात. तेव्हा पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करावेत. त्याला तत्काळ मान्यता देण्यात येईल. पोलिसांच्या घरांचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, कर्तव्य कालावधीचे प्रश्न, कर्तव्य सहजतेने पार पाडता येतील यासाठीच्या सुधारणांसाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

आपली प्रतिक्रिया द्या