प्रतिभाताईंनी राष्ट्रपती म्हणून देशाची मान जगभरात उंचावली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गौरवोद्गार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानसभेच्या उपसभापतीपदापासून ते मंत्री, विरोधी पक्षनेत्या, राज्यसभेतले उपाध्यक्षपद, राज्यपाल आणि राष्ट्रपतीपदाचे सर्वोच्च पद भूषविल्यानंतरही प्रतिभाताई पाटील यांनी कुटुंब कसे चालवावे याचा एक वेगळा आदर्श सर्वांसमोर ठेवला. राष्ट्रपती म्हटले की सुख आणि सोयी आल्याच. त्या बाजूला ठेवून ‘सुखोई’सारख्या वेगवान विमानातून झेपावण्याचे धाडस प्रतिभाताईंनी दाखवले. प्रतिभाताईंनी राष्ट्रपती म्हणून देशाची मान जगभरात उंचावली, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिभाताई पाटील यांना 85व्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन केले.

प्रतिभाताईंच्या वाढदिवसानिमित्त नागपूरच्या यशवंतराव चव्हाण केंद्र येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार केला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, प्रतिभाताईंच्या वाढदिवसाबद्दलचा सत्कार मुख्यमंत्री म्हणून करू शकेन हे माझ्या स्वप्नातसुद्धा नव्हते. माझ्या हस्ते झालेला हा पहिला सत्कार असल्याचे ते म्हणाले. शिवसेनेने प्रतिभाताईंना पाठिंबा दिल्याचे जाहीर केले तेव्हा सगळय़ांना एक धरणीकंप झाल्यासारखे वाटले. हे काय, शिवसेना एनडीएमध्ये आहे आणि काँग्रेसच्या उमेदवाराला कसा पाठिंबा देणार? त्याही वेळी आमच्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न झाला. दडपण मी नाही स्वीकारले तर बाळासाहेब काय स्वीकारणार होते. रोज बातम्या यायच्या आणि तारखा यायच्या. 5 तारखेपर्यंत निर्णय घ्या नाहीतर… तारखा मागून सांगितले जायचे नाहीतर… नाहीतर काय करणार तुम्ही? शिवसेनाप्रमुखांचे स्पष्ट आणि ठाम मत होते की, माझ्या महाराष्ट्राची कन्या पहिली महिला राष्ट्राध्यक्ष होतेय. त्याच्या आड मी येणार नाही आणि कुणाला येऊ देणार नाही. तुम्हाला काय करायचे आहे ते करून घ्या. एक ठाम निर्णय होता तो. निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या अभिमानात सहभागी होता आले हा भाग्याचा क्षण होताच. त्यानंतर प्रतिभाताईंनी राष्ट्रपती म्हणून देशाची मान उंचावली ते अभिमानास्पद!

देशाचे संविधान ही लोकशाही धर्माची गीता – प्रतिभाताई पाटील

राजकारणात मतभिन्नता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातही होती, मात्र मतभिन्नता नव्हती. संविधानिक पदाची शपथ घेतल्यानंतर धर्मनिरपेक्षतेबाबत दुमत असूच शकत नाही असे सांगत देशाचे संविधान ही लोकशाही धर्माची गीता असल्याचे प्रतिपादन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी केले. हिवाळी अधिवेशनाला शुभेच्छा देताना विदर्भाचा जलद आणि सर्वंकष विकास होणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या. लेकींचा सत्कार करणे महाराष्ट्राची परंपरा आहे याचा साक्षात्कार 2007 मध्ये जेव्हा महाराष्ट्राची लेक म्हणून मला जे समर्थन केले होते त्यातून आला. बाळासाहेबांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा प्रभाव आणि प्रसार वाढविला आहे. राजकारणाला नवे वळण देऊन देशाचे लक्ष वेधणारे शरद पवार हे मुत्सद्दी नेते असल्याचा त्यांनी उल्लेख करून प्रतिभाताई पाटील यांनी दोघांचेही आभार मानले.

बाळासाहेबांनी महाराष्ट्राच्या कन्येला पाठिंबा दिला – शरद पवार

मी मुख्यमंत्री असताना प्रतिभाताई पाटील या विरोधी पक्षनेत्या होत्या. तसा त्यांचा स्वभाव मृदू असला तरी विरोधी पक्षनेत्या म्हणून मला तो कधी जाणवला नाही असे म्हणत त्यांनी पुन्हा सभागृहात हशा पिकविला. प्रतिभाताईंचे नाव राष्ट्रपती म्हणून सोनिया गांधी यांनी सुचविले होते तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा करायला गेलो असता बाळासाहेबांनी, ‘महाराष्ट्राच्या कन्येला समर्थन देण्यासाठी चर्चा कशाला हवी’ असे सांगत शिवसेना एनडीएसोबत असतानासुद्धा प्रतिभाताईंना समर्थन दिले होते, असे शरद पवार यांनी सांगितले.