
लॉकडाऊन जाहीर करून सर्व बंद करणे सोपे आहे पण आता आपण काही भागात जेव्हा मर्यादित प्रमाणात हालचालींना परवानगी देतो आहे तेव्हा आपल्यावरची जबाबदारी आणखी वाढते हे लक्षात ठेऊन प्रत्येक जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलीस अधिकारी यांनी पुढील काळात अजिबात गाफील न राहता काम करावे अशा स्पष्ट सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्स बैठकीद्वारे राज्यातील प्रशासनाला दिल्या.
सोमवार 20 एप्रिलपासून जो भाग कंटेनमेंट क्षेत्र नाही अशा ठिकाणी विशेषत: पालिका क्षेत्राच्या बाहेर स्थानिक प्रशासनाने संपूर्ण आढावा घेऊन मर्यादित प्रमाणात उद्योग, व्यवसाय सुरु करण्यासंदर्भात सुधारित देण्यात आल्या आहेत. त्याविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत कामगारांची निवास व्यवस्था त्याच परिसरात होत असेल आणि कामगारांची वाहतूक होणार नसेल तर तसे उद्योगांनी लिहून देणे गरजेचे आहे. एमयडीसीने यासाठी त्यांच्या पोर्टलावर नोंदणीची व्यवस्था केली आहे त्यानुसार जिल्हाधिकारी आणि उद्योग विभागाचे अधिकारी यांनी व्यवस्थित छाननी करून मान्यता द्यायची आहे.
मान्सूनपूर्व कामांकडेही लक्ष द्या
कोरोनाची लढाई सुरु होऊन 6 आठवडे होत आहेत. आता लवकरच उन्हाळा संपेल आणि पावसाळ्याचे वेध लागतील. विशेषत: पुण्या मुंबईसारखे महानगर आणि इतर शहरांमध्ये यादृष्टीने मोठ्या प्रमाणावर पाणी साचणे, पूर परिस्थिती उद्भवेल अशा ठिकाणी कामे हाती घेऊन संपवावी, आवश्यक ती बांधकामे, दुरुस्त्या करणे गरजेचे आहे तेही करावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
























































