
राज्यातील नागरी सहकारी बँकांच्या नोकरभरतीची प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबवण्याचा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्य म्हणजे सहकारी बँकांच्या नोकरभरतीमध्ये जवळच्या नातेवाईकांची लागणारी वर्णी लक्षात घेऊन नागरी सहकारी बँकांच्या संचालकांना नोकरभरतीच्या प्रक्रियेपासून चार हात लांब ठेवण्याचे आदेश राज्याच्या सहकार विभागाने दिले आहेत.
राज्याच्या आरोग्य विभागात मध्यंतरी सुमारे सहा हजारांहून अधिक नोकरभरतीची प्रक्रिया राबवण्यात आली. यामध्ये अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे भविष्यातील नोकरभरतीमध्ये कोणतेही आरोप-प्रत्यारोप न होता भरती प्रक्रिया पारदर्शकपणे होण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने पावले उचलली आहेत. त्याची सुरुवात नागरी सहकारी बँकांमधील नोकरभरतीपासून होणार आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याच्या सहकार विभागाने नोकरभरतीबाबत नव्याने आदेश जारी केले आहेत. राज्यातील नागरी सहकारी बँकांचे कामकाज पारदर्शकपणे होण्यासाठी व निष्पक्ष व विश्वासार्ह भरती प्रक्रिया राबवण्यासाठी राज्यातील सर्व नागरी सहकारी बँकांना ऑनलाइन पद्धतीने भरती प्रक्रिया राबवण्याचे आदेश राज्याच्या सहकार विभागाने दिले आहेत.
या नोकरभरतीसाठी किमान पाच राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, नागरी सहकारी बँका तसेच शासनातील विविध विभागांसाठी ऑनलाइन प्रक्रियेद्वारे नोकरभरती राबवण्याचा अनुभव असणाऱया नामांकित संस्थांना प्राधान्य देण्यात यावेत असेही आदेशात नमूद केले आहे. या निर्णयामुळे वशिल्याच्या उमेदवारांना पायबंद बसेल असे सहकार विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले.
- संबंधित नागरी सहकारी बँकेचे संचालक व त्यांच्या नातेवाईकांना नोकरभरती प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.
- कोणत्याही नागरी सहकारी बँकेत वीसपेक्षा अधिक पदे भरायची असल्यास संबंधित नागरी सहकारी बँकेला ऑनलाइन पद्धतीने भरती प्रक्रिया राबवणे आवश्यक.
- भरती प्रक्रिया राबवताना रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब केल्याचे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारकडे सादर करावे लागेल.
- ऑनलाइन नोकरभरतीसाठी अधिकृत एजन्सीचे राज्यस्तरीय पॅनेल सहकार आयुक्तांनी तयार करावे, यात नागरी सहकारी बँक फेडरेशन, राज्य सहकारी बँक असोसिएशन आणि जिल्हा सहकारी बँक असोसिएशनला प्राधान्य देण्यात यावे.
- वीसपेक्षा कमी पदे भरायची असल्यास संबंधित नागरी सहकारी बँकेने सहकार आयुक्तांनी तयार केलेल्या अधिकृत एजन्सी पॅनलमधील संस्थांकडून पारदर्शक पद्धतीने परीक्षा घेऊन नोकरभरती करावी तसेच स्टाफिंग पॅटर्नला नागरी सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी घ्यावी लागेल.
- ऑनलाइन नोकरभरतीमधून शिपाई, वॉचमन, ड्रायव्हर तसेच वरिष्ठ स्तरावरील व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱयाला व तांत्रिक अधिकाऱयाला वगळण्यात येणार आहे.


























































