कसारा-इगतपुरीच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीचे डबे घसरले, वाहतूक ठप्प

मुंबई ते नाशिक रेल्वेमार्गावरील कसारा स्थानकानजीक मालगाडीचे डबे रुळावरून घसरले आहेत. त्यामुळे नाशिकच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. रविवारी सायंकाळच्या सुमाराला ही दुर्घटना घडली.

रविवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमाराला एक मालगाडी इगतपुरीच्या दिशेने जात होती. त्यावेळी कसारा रेल्वेस्थानकानजीक रेल्वे ट्रॅक क्रॉस करताना मालगाडीच्या इंजिनापासूनचे पाच डबे रुळावरून घसरले. त्या डब्यांपैकी 2 डब्यांचे कपलिंग तुटले आणि ते बाजूच्या ट्रॅकवर पडले.

परिणामी मुंबई नाशिक रेल्वेमार्गावरील अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या अपघाताबाबत कळताच रेल्वे प्रशासनातील संबंधित अधिकारी, अपघात नियंत्रण पथक, रेल्वे पोलीस इत्यादी घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.