
लघु व मध्यम उद्योगांना मंजूर झालेला कोळसा वाहतुकदारांनी खुल्या बाजारात विकण्याचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी सात दिवस तपास करून मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. चंद्रपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत कोळसा भरलेले सुमारे 25 ट्रक पकडले होते. उद्योगांच्या नावावर खाणीतून चांगल्या प्रतीचा कोळसा उचल करायचा. मात्र, तो थेट उद्योगात न पोचवता खासगी प्लॉटवर उतरवून दुय्यम प्रतीचा कोळसा भरून उद्योगांना पाठवण्याचा प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. चांगला कोळसा खुल्या बाजारात विकून दुप्पट पैसे कमावण्याचा धंदा चंद्रपुरातील काही कोळसा व्यापारी अनेक दिवसांपासून करीत आहेत. पण आजवर या व्यापाऱ्यांना राजकीय वरदहस्त असल्यानं पोलिसही कारवाईसाठी धजत नव्हते.
राज्यात सत्ता परिवर्तन होताच हे कोळसा चोर पकडल्याने यांना कुणाचे पाठबळ होते, हे समोर आले आहे. कोट्यवधींची उलाढाल या घोटाळ्यात होत असते. खनिकर्म विकास महामंडळातर्फे लघु व मध्यम उद्योगांना सबसिडीच्या दारात कोळसा मिळतो. मात्र, हा कोळसा या उद्योगांपर्यंत पोचतो की नाही, याची शहानिशा महामंडळ कधीच करीत नाही. त्यामुळे उद्योगांसाठी वाहतुकीचे काम सांभाळणारे कंत्राटदार चोरी खुलेआम करतात, अशी माहिती समोर आली आहे. वाहतुकीचे कंत्राट कैलाश अग्रवाल याला मिळाले होते. पोलिसांनी आता याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याने कोळसा घोटाळ्यात कुणकुणाचे हात काळे झाले, हे बाहेर येण्याची शक्यता आहे. मात्र, या प्रकरणी अजूनपर्यंत कुणालाही अटक झालेली नाही.




























































